Ticker

6/recent/ticker-posts

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर १ डिसेंबरपासून सुविधा उपलब्ध होणार!


अनुयायांसाठी सर्व सोयीसुविधा वेळेत पूर्ण करा; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रशासनाला निर्देश


चित्रा न्युज ब्युरो 

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आयोजनाची सर्व कामे वेळेत पूर्ण करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

चैत्यभूमी परिसरात वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. ४ ते ६ डिसेंबर या कालावधीसाठी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचा विशेष आराखडा तयार करावा. विशेष म्हणजे अनुयायांसाठी आवश्यक सर्व सुविधा १ डिसेंबरपासूनच उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

ड्रोन शो, प्रदर्शन आणि लघुपटांचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा व्यापक प्रसार व्हावा, यासाठी ५ व ६ डिसेंबर रोजी ड्रोन शो, जीवनकार्यावरील विशेष प्रदर्शन तसेच लघुपटांचे आयोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. अनुयायांच्या सोयीसाठी बेस्ट आणि एसटीच्या अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करून देण्यासह ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी मोफत वातानुकूलित बससेवा सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

याशिवाय पुस्तकांचे स्टॉल, बार्टीच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल, वृक्षारोपण आणि व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रस्तावित संविधान मार्गासह चैत्यभूमी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्याबरोबरच प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नामवंत लेखकांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असलेला ‘लोकराज्य’ मासिकाचा विशेषांक प्रकाशित करण्याची सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, सहायक पोलीस आयुक्त मनोज जोशी, एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सागर पळसुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या