Ticker

6/recent/ticker-posts

चिखलीत प्रथमच महाराजा यशवंतराव होळकरांची जयंती साजरी



शैलेश धारेंनी उलगडला यशवंतरावांचा जीवनपट


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

बुलढाणा: आद्य स्वातंत्र्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांनी ब्रिटिशांविरोधात दिलेला लढा समस्त हिंदुस्थानास प्रेरक असा आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांची ३४६वी जयंती चिखली शहरात प्रथमच साजरी करण्यात आली. शनिवार ३ डिसेंबर रोजी शहरातील अहिल्यादेवी नगर येथील अहिल्यादेवी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथील इतिहास अभ्यासक शैलेश धारे यांचे या निमित्ताने व्याख्यान संपन्न झाले. समाजाला माहीत नसलेला होळकरशाहीचा रंजक इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. "हिंदुस्थानातील शेवटचा सार्वभौम राजा म्हणून यशवंतराव होळकर यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या जीवनातून धैर्य साहस राजनीती, गनिमीकावा, युद्धनीती, शस्त्रविद्या यांचे दर्शन घडते. तडप व शौर्य हे त्यांचे महत्त्वाचे गुण होते." असे धारे यांनी सांगितले. चिखलीतील समाजबांधवांशी बोलताना, यशवंतराव होळकरांची जयंती यापुढेही उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करावी, असा विचार त्यांनी व्यक्त केला. से.नि.गटशिक्षणाधिकारी जुमडे, युवा नेतृत्व नंदू लवंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वीर यांनी केले. यावेळी सकाळपासून अनेकांनी कार्यक्रम स्थळी येऊन होळकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यामध्ये गोपाल देव्हडे, गजानन कळंगे, दीपक हाके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कडुबा गवारे, शैलेश धारे, सागर खरात, जगन्नाथ गवारे, श्रावण भुसारी, विलास खरात यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या