आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त कार्यशाळा
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा : सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा.विद्या मानकर, विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे हृदयरोगतज्ञ डॉ.आकाश लोहकरे, आहारतज्ञ राखी कलंत्री, महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेजच्या आयुर्वेदाचार्य डॉ. पुनम सावरकर उपस्थित होते.
तृणधान्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतात. त्याचबरोबर सदर प्रक्रिया उद्योगांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत अनुदानही घेता येईल. त्यामुळे जिल्ह्यात तृणधान्यावर आधारित उद्योग स्थापण व्हावे, असे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. प्रास्ताविकपर संबोधनात डॉ. विद्या मानकर यांनी जागतिक अन्न व कृषी संघटनेने 2023 वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याचे नमूद करून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वर्षामध्ये निरनिराळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. बदलत्या जीवनमानामुळे हृदयरोग, मधुमेह व पोटांचे विकार याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर व राजगिरा अशा तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्व सुद्धा वाढू लागले आहे, असे डॅा.मानकर यांनी सांगितले.
विभागीय कृषि सहसंचालक श्री.साबळे यांनी शेतीपूरक व्यवसाय व कृषि विभागाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. हृदयरोग तज्ञ डॉ.लोहकरे यांनी हृदयाचे आरोग्य विशेषतः तरुण मुलांमध्ये सुद्धा हृदय रोगाचे वाढते प्रमाण आणि ते कमी करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्व आपल्या अनुभवातून उपस्थितांना विषद केले. आयुर्वेदाचार्य डॉ.सावरकर यांनी पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, भगरचे आहारात असणारे महत्व तसेच त्यापासून शरीराला मिळणारी पोषण मुल्ये, शरीरातील दोष याबाबत सविस्तर माहिती दिली.
आहारतज्ञ राखी कलंत्री यांनी तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती देतांना शाळकरी मुलांनासुद्धा हे पदार्थ देण्यात यावे, जेणेकरून मुलांचा शारीरिक विकास होण्यास मदत होईल, असे सांगितले. अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी म्हणून ग्राम सेवा संघाचे सचिव अतुल शर्मा यांनी तृणधान्य लागवडीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना येणारे प्रश्न लक्षात घेता शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊन तृणधान्यापासून मिळालेले उत्पादन सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीद्वारे वितरीत केल्यास शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होईल व पर्यायाने तृणधान्य पिकाच्या लागवडी मध्ये सकारात्मकता निर्माण होईल, असे सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र, सेलसुराचे कार्यक्रम समन्वयक डॅा.जीवन कतोरे यांनी तृणधान्य लागवड व व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. धरामित्र संस्थेच्या रुपल वाघ, अनिकेत लिखार यांनी ओडीसा राज्यात 'ओडीसा मिलेट मिशन' मध्ये प्रत्यक्ष काम केले असुन तेथील अनुभव त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे संचालन तंत्र अधिकारी रश्मी जोशी यांनी केले तर आभार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी परमेश्वर घायतीडक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या