Ticker

6/recent/ticker-posts

चूलबंद नदी घाटातील अवैध रेती उपसा व वाहतूक सुरुच !


रेती तस्करांना स्थानिक प्रशासनाचा आशीर्वाद

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा:- महसूल , खनिकर्म व पोलिस विभागाचे आशीर्वादाने चुलबंद नदीच्या सर्वच रेती घाटातून सुरू असलेला अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याच्या चर्चा मुरमाडी/तूप परिसरात होत असून या प्रकाराने पर्यावरणाचे अपिरीमित नुकसान होत आहे. तर चूलबंद नदी खोऱ्यातील रस्त्यांची ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे दुर्दशा झाली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष पुरविणे गरजेचे झाले आहे. 
          चुलबंद नदी लाखनी तालुक्याची जीवनदायिनी असून या नदीमुळे लाखनी व साकोली तथा लाखनी व लाखांदूर तालुक्याची दक्षिण-पूर्व सीमा निर्धारित होते. या नदी पात्रात मिरेगाव , सोनमाळा , भूगाव , पळसगाव , विहीरगाव , नरव्हा , पाथरी , मरेगाव येथे रेतीघाट असले तरी शासनाने लिलाव केले नसल्यामुळे महसूल , खनिकर्म व पोलिस विभागाचे आशीर्वादाने रेती तस्कराकडून नदी पात्रातील रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. या प्रकाराने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत असला तरी महसूल व पोलिस विभागातील अधिकारी , कर्मचाऱ्यांचे उखळ पांढरे होत आहेत. 
           सोनमाळा , भूगाव , कोलारी , खराशी , कवलेवाडा , गुरढा येथील तलाठी कार्यालयासमोरून तर पालांदूर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील रस्त्यावरून रात्र दिवस अवैध रेती वाहतूक होत असली तरी वरची कमाई बंद होण्याचे भितीपोटी या गैरप्रकारावर आळा घालण्याचे सौजन्य संबंधित विभागाकडून दाखविले जात नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नदी पात्रातून शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे रेती उपसा केला जात नसल्यामुळे भूगर्भात पाण्याचा निचरा होत नाही. तसेच ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे नदी खोऱ्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे आणि पर्यावरणाचे अपिरिमित नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः लक्ष पुरवून चूलबंद नदी पात्रातून होणारा अवैध रेती उपसा व वाहतूक बंद करणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या