Ticker

6/recent/ticker-posts

संबंधित शासकीय विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रनिहाय उप समित्यांची स्थापना




सर्व शासकीय यंत्रणा व खासगी संस्थांनी एकत्रित येवून
जिल्ह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

सन 2047 पर्यंतचा जिल्ह्याचा विकास आराखडा करण्याचे नियोजन

उप समित्यांमध्ये त्या त्या क्षेत्रातील जिल्ह्याची बलस्थाने व उपलब्ध संधीबाबत सविस्तर विश्लेषण  
 आवश्यक

पुढील बैठक लवकरच घेवून जिल्ह्याचा विकास आराखडा अंतिम करण्यात येणार

प्रतिनिधी चित्रा न्युज
कोल्हापूर: शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सन 2047 पर्यंतचा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याचे नियोजित आहे. यानुषंगाने सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख व जिल्ह्याच्या विकासात भर घालणाऱ्या विविध उद्योग, व्यावसायिकांच्या संघटनांनी एकत्रित येवून पुढील 25 वर्षांचा जिल्ह्याच्या विकासाचा उत्कृष्ट आराखडा सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
         येथील ताराराणी सभागृहात जिल्हा विकास आराखड्याबाबत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. रेखावार मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, संचालक आदित्य बेडेकर, टाकचे अध्यक्ष बळीराम वराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, समितीचे समन्वयक संदेश जोशी यांच्यासह अन्य विभाग प्रमुख व असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
        जिल्हाधिकारी श्री. रेखावार पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा सादर करत असताना जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत असणारे विविध उद्योग, संस्था व संघटना यांचे सर्व प्रतिनिधी व सर्व शासकीय यंत्रणेचे प्रमुख यांनी एकत्रित येवून सेक्टर वाईज विविध मुद्यांवर चर्चा करुन विश्लेषण करावे. यासाठी संबंधित विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या असोसिएशनच्या उप समित्यांची स्थापना करावी. या उप समित्यांनी त्या त्या क्षेत्रातील संस्थांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींशी त्या त्या क्षेत्रातील विकासासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करुन समित्यांनी  याच आठवड्यात विश्लेषणात्मक अहवाल जिल्हास्तरीय समितीला सादर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. 
  जिल्ह्याच्या विकास आराखड्याबाबतच्या बैठकीत चर्चा करताना लघु, मध्यम व दीर्घ कालावधीचा विचार करा. लघु कालावधी पाच वर्षे, मध्यम पंधरा वर्षे व दीर्घ कालावधी पंचवीस वर्षाचा असावा. यानुसार शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा समितीने विचार करावा व या सूचनांमध्ये अधिकचे मुद्दे सविस्तरपणे घ्यावेत. सर्व उप समित्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करुन हा विकास आराखडा मंजूर करुन तो शासनाला सादर करण्यात येईल, असे  जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.
        प्रारंभी समन्वयक श्री. जोशी यांनी जिल्हा विकास आराखडा बाबत सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या