• लाखनी पंचायत समितीमधील प्रकार
• गट विकास अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविण्याची गरज
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याकडून घरकुलाचे लेआऊट देणे, जियो टॅगींग व फोटो अपलोड करणे, झालेल्या बांधकामानुसार हप्ता वितरित करण्यासाठी घरकुलाचे बांधकाम कोणत्या स्टेज पर्यंत आले. हे पाहण्यासाठी वेळोवेळी भेटी द्याव्या लागतात. यातूनच घरकुल लाभार्थ्यांची ओळख व अर्थकारण सुरू होते. काही गृह निर्माण अभियंत्याकडून लाभार्थ्यांना चुकीची माहिती देऊन घरकुल लाभार्थ्यांची लूट केली जात असल्याच्या चर्चा तालुक्यात होत आहेत. गट विकास अधिकाऱ्यांनी तो ग्रामीण गृह निर्माण अभियंता कोण ? याचा शोध घेऊन त्याचेवर कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांची लूट थांबविणे गरजेचे झाले आहे.
ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये असून मोडकळीस आलेल्या मातीच्या कच्या घरात वास्तव्य करणाऱ्या व भाड्याचे घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. अनुसूचित जातीकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजना, ओबीसी करिता मोदी आवास योजना, भटक्या जाती विमुक्त जमाती करिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इमारत व इतर बांधकाम श्रमिकांकरिता अटल आवास योजना राज्यात सुरु आहे.
घरकुलाचे बांधकाम सूचारू पद्धतीने व दर्जेदार व्हावे. या करिता मानधन तत्वावर ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याची सी.एस.सी. ह्या बाह्यस्त संस्थेकडून नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामीण गृह निर्माण अभियंत्यांना घरकुलाचे लेआऊट देणे, बांधकाम सुरू असलेल्या घरकुलांना वेळोवेळी भेटी देऊन कामाचे जियो टॅगिंग व फोटो अपलोड करणे, पात्र घरकुल लाभार्थ्यांची आवश्यक ती कागदपत्रे गोळा करणे, मौका तपासणी करून घरकुल लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे, झालेल्या बांधकामानुसार हप्ता वितरित करणे इत्यादी कामे करावी लागतात. त्यांचा वेळोवेळी घरकुल लाभार्थ्यांशी संपर्क येत असल्यामुळे ओळख होते.
पंचायत समिती लाखनी अंतर्गत ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून त्यापैकी ९३ लोक वस्तीची तर १० गावे रीठी आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून तालुक्यास १ हजार ४५४ मोदी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत २२५, शबरी आवास योजनेअंतर्गत ५४ आणि रमाई आवास योजनेअंतर्गत १९२ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले असून काही गावात कागदपत्र गोळा करणे तर काही गावात घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. पंचायत समितीत १० ग्रामीण गृह निर्माण अभियंते कार्यरत असून प्रत्येकाला गावे वाटप केलेली आहेत. त्या त्या गावातील घरकुल लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि बांधकाम झालेल्या घरकुलास टप्पेनिहाय निधी उपलब्ध करण्याचे काम ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याकडे आहे. पण काही अभियंत्याकडून घरकुल धारकांना पैशाची मागणी करून आर्थिक लूट केली जात असल्याच्या तालुक्यात चर्चा होत असून पंचायत समिती प्रशासनाने ते अभियंते कोण ? याचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांची लूट थांबविणे आवश्यक झाले आहे.
0 टिप्पण्या