संजय देशमुख चित्रा न्युज
शिर्डी –मतदान यंत्र व मतदान कार्यपध्दती याविषयी प्रशिक्षण देणारा शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनविलेला व्हिडिओ राज्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला. 'आरओ शिर्डी (RO SHIRDI)' या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला निवडणूक प्रशिक्षणाची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आजपर्यंत १ लाख ३८ हजार प्रेक्षकांनी पाहिला आहे.
राज्यातील लोकसभा निवडणूका पाच टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत राज्यात तीन टप्प्यात निवडणूका पार पडल्या आहेत. यात १३ मे व २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील निवडणूका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला.त्यानंतर काही दिवसातच म्हणजे ३ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक प्रशिक्षणाची माहिती देणारा १ तास ४८ मिनिटांचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला. या व्हिडिओत स्वत: बाळासाहेब कोळेकर व वर्धा उपजिल्हाधिकारी सायली सोळंके-वमने यांनी निवेदन केले आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी या व्हिडिओत प्रास्ताविक केले आहे.
निवडणूक प्रशिक्षणाविषयी मराठी भाषेत साध्या-सोप्या भाषेत, तसेच नाट्य रूपांतराच्या माध्यमातून माहिती देणाऱ्या व्हिडिओची समाजमाध्यमांवर कमतरता होती. निवडणूक प्रशिक्षणाविषयी माहिती देणारे युट्यूबवर असलेले बहुतांश व्हिडिओ इंग्रजी व हिंदी भाषेत आहेत. शिर्डी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने बनविलेला व्हिडिओ मराठीत असल्यान निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला.
या व्हिडिओत मतदान यंत्रांची तोंड ओळख, यंत्राची जोडणी, मतदान करण्याची पध्दत, मॉकपोल पूर्वीची तयारी, मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था, मॉकपोल पूर्वीची तयारी, मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था, मॉकपोलची कार्यपध्दती, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटची मुलभूत माहिती, मतदान यंत्र सीलबंद करण्याची प्रक्रिया, मतदान केंद्रातील मतदानाची कार्यपध्दती व मतदान अधिकाऱ्यांची कामे, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतदानाची वेळ समाप्त होण्यापूर्वी चिठ्ठ्या वाटपाची कार्यवाही, मतदान समाप्तीनंतर मतदान यंत्र, ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मोहोरबंद करण्याची पध्दत व महत्त्वाचे फॉर्म्स, ईडीसीद्वारे मतदान आदी प्रक्रियेविषयी माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे.
या व्हिडिओत काही सुधारणांसह चार दिवसापूर्वी नवीन व्हिडिओ 'आरओ शिर्डी (RO SHIRDI)' या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या व्हिडिओला ही अल्पकाळात साडेतीन हजार प्रेक्षकांनी भेट दिली आहे.


0 टिप्पण्या