हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिष्कीली आणि कविता या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्या नगरमध्ये अविनाश महागावकर यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात होणार आहे, अशी माहिती शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
सोलापूरकर रसिकांसाठी हास्यकवितांची पर्वणी : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने सोलापूरकरांसाठी हास्यकवितांची आणि मिष्कील किस्सांची पर्वणी देण्यात येणार आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वदूर अल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. अशा आनंददायी वातावरणात हास्याचे फवारे उडवणार्या कविता आणि मिष्कील किस्से ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर सादर करणार आहेत.
मसाप दक्षिण शाखेच्या उपक्रमांची परंपरा : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी देखील महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक, कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कथा, कवितांवर आधारीत "विंदा एक स्मरणसाखळी" हा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
तसेच, महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दुबईतील "मसाला किंग" म्हणून ओळख निर्माण करणारे धनंजय दातार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूरातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरला. मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी लेखन केलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन थाटात करण्यात आले.
सोलापूरकरांसाठी आवाहन : पावसाळी वातावरणात आयोजित हास्य कविता आणि मिष्किलीचा हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या