हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर :-राज्य मंडळाच्या सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक व्हावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये गावागावांत बालकांची बैलगाडी, घोडागाडी, उंट यावरून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात व आनंदाने करणे आवश्यक आहे. प्रवेशपात्र मुलांना शाळेत प्रवेश देणे, त्यांना शाळेत टिकवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. शाळा हे बालकांचे भावविश्व घडवते. सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडणघडणीत शोळेचे अद्वितीय स्थान आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. याअनुशंगाने जिल्हा ते शाळा, गावपातळीपर्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकायनि शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या घरी भेट दिली जाईल. शाळा सुरू होण्याच्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत केले जाईल. त्यांना मोफत पुस्तकांचे वितरण केले जाईल. तत्पूर्वी, सकाळी ७ वाजता गावात, वॉर्डात देशभक्तीपर गीते गात, नारे देत नवीन प्रवेशित बालकांची बैलगाडी, घोडागाडी, उंट यावरून मिरवणूक काढण्यात येईल. यात युवक, गावकरी, ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून घेतले जाईल.
लाऊडस्पीकरवर नावांची घोषणा गावातील, वॉर्डातील प्रवेशपात्र
बालकांच्या नावांची यादी तयार करण्यात आलेली आहे. शाळेच्या पूर्वदिनी ज्या प्रवेशपात्र बालकांना प्रवेश दिला आहे, त्यांची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित प्रवेशपात्र बालकांची नावेही लाऊडस्पीकरवरून घोषित करून त्यांचा प्रवेश घेण्याचे आवाहन पालकांना केले जाईल. एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ
शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांनी शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी, पालकांना प्रोत्साहित करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे.
0 टिप्पण्या