Ticker

6/recent/ticker-posts

साकोली विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात


 मागोवा विधानसभा निवडणुकीचा--

 रवी भोंगाने साकोली

साकोली:- आगामी दोन महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे विविध पक्षांनी उपक्रमाच्या माध्यमातून मोर्चेबांधणिला सुरुवात केली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तिन्ही तालुक्यात कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेणे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सुरू केले आहे. अद्याप उमेदवार घोषणेला वेळ असला तरी आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आशेवर भावी उमेदवार कामाला लागल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ मात्र १९९० पासून येथील राजकारणात स्थित्यंतर झाले. डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी पहिल्यांदा काँग्रेस कडून हा मतदारसंघ हिसकावून भाजपच्या पदरात टाकला. पुढे १९९५ ची निवडणूकही त्यांनी जिंकली. यानंतरच्या काळात सेवक वाघाये यांचा राजकीय उदय झाला. १९९९ आणि २००४ या दोन्ही निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्यात. याच काळात २००४ पर्यंत लाखांदूर हा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. लाखांदूर मधून नाना पटोले यांनी २००४ मध्ये निवडणूक जिंकली होती. मात्र पुढे परिसिमन आयोगाच्या फेररचनेत हा मतदारसंघ साकोलीत विलीन झाला. नाना पटोले यांनी २००९ च्या निवडणुकीत साकोली गाठले. पुढे २०१४ च्या निवडणुकीत बाळा काशिवार यांनी निवडणूक जिंकून भाजपचा गड कायम ठेवला. २०१७ मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमधून काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोले यांनी २०१९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रात विजय मिळवून ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली. याच काळापासून परीणय फुके यांनी त्यांच्या पुढे येथे तगडे आव्हान उभे केले होते. सदर मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीपर्यंत 3 लक्ष २२  हजार ९६१ मतदारांची नोंद आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोले यांना एकूण ९५ हजार २०८ मते पडली. त्यामुळे ६ हजार २४० मतांना त्यांचा निसटता विजय झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावेळी भाजपच्या परिणय फुके यांना ८८ हजार ९६८ तर वंचितचे सेवक वाघाये यांना ३४ हजार ४३६ मते पडली होती. दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रशांत पडोळे यांना साकोली विधानसभा क्षेत्रात इतर मतदार क्षेत्रांपेक्षा भरपूर लीड मिळाल्याने येती विधानसभा निवडणूक विरोधी पक्षाला घाम फोडायला लावणारी आहे हे निश्चित. आमदार नाना पटोले महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असल्याने विधानसभा क्षेत्रात त्यांना साधारण समजून चालणार नाही. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजप पक्ष क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात सध्या तरी आघाडीवर दिसून येत आहे.
------------------------------------------------------------------
 साकोली विधानसभा क्षेत्रात महिला आमदाराचे वावडे 
महिलांचा राजकारणातील सक्रिय सहभाग हा नेहमी चर्चिला जाणारा विषय. राजकारणात महिलांची भागीदारी वाढावी यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहेत. मात्र साकोली विधानसभा क्षेत्रात विरोधीभासी चित्र आहे. आजवरच्या इतिहासात एकही महिला आमदार विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेली नाही. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या तीनही मतदार संघातून केवळ ३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यात तुमसर मध्ये २ तर साकोली विधानसभेत १ महिला उमेदवार उभी होती.विशेष बाब अशी की, एकाही पक्षाने महिलेला उमेदवारी दिली नव्हती. महिलांचा राजकारणात सहभाग वाढावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्या गेले. मात्र विधानसभेत महिलांसाठी कोणताही मतदारसंघ आरक्षित नाही.गत लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांनी पाठ फिरवल्याने भाजपला पराभवाला सामना करावा लागला अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे यावेळी तरी साकोली विधानसभा क्षेत्रात महिला उमेदवाराला संधी मिळेल काय हा प्रश्न कायम आहे. 
------------------------------------------------------------------
विधानसभा क्षेत्रात प्रश्नांचा गुंता कायमच

या मतदारसंघात सिंचन आणि औद्योगिक विकासाची वानवा नेहमीच राहिलेली आहे. निन्मचुलबंद, भीमलकसा प्रकल्प अद्यापही शंभर टक्के पूर्ण झालेला नाही. साकोलीत कृषी विज्ञान केंद्र, मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे मात्र त्याकडे सर्वच जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. पर्यटनाला वाव असला तरी कोणतीही विकासाची योजना नाही. लाखनी तालुक्यातील अशोक लेलँड वगळता अन्य कोणत्याही उद्योगाला वाव मिळाला नाही. भेल प्रकल्पाचे गाजर दाखवीत शेतकरी आणि बेरोजगारांची थट्टा जनप्रतिनिधींनी उडवल्याची भावना येथे दृढ आहे. राष्ट्रीय महामार्ग लगत ४०० एकर वर जागा अधिकृत आहे. मात्र फलक व संरक्षित भिंतीशिवाय काहीच नाही. त्या जागेवर आता जंगल झाले आहेत. प्रफुल पटेल यांनी केंद्रीय मंत्री असतांना २००९ मध्ये आणलेला हा प्रकल्प आजही दिवा स्वप्नच आहे.भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे या प्रकल्पावरून  एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप आता नेहमीच मतदारांसाठी चर्चेची झाली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या