• धर्मापुरी उपसरपंच व सचिवाचा अफलातून कारभार
• ग्रामस्थांची पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामसभेबाबद शासनाने काही नियम केले आहेत. त्यात मतदार यादीच्या १० टक्के किंवा कमीतकमी १०० ग्रामस्थ उपस्थित असतील तर कोरम(गणपूर्ती) झाली समजून ग्रामसभा सुरू करावी. असा नियम असताना ग्रामपंचायत धर्मापुरीने १६ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेला ६२९ ग्रामस्थ उपस्थित असतांनाही उपसरपंच व ग्रामसेवकाने ग्रामसभा तहकूब केल्याचा अफलातून कारभार उघडकीस आला असून उपसरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करिता ग्रामस्थांचे वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती साकोली यांचेकडे तक्रार करण्यात आली असून प्रतीलीपी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा व जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविण्यात आल्या असून पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाकडून संबंधितांवर काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
साकोली पंचायत समितीचे अधिनस्त ग्रामपंचायत धर्मापुरीची १६ ऑगस्ट २०२४ ला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पुष्पा खोटेले, ग्रामसेवक एल.एम. नान्हे, उपसरपंच राजेश भेंडारकर यांचेसह ६२९ ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. उपसरपंच राजेश भेंडारकर यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना बाजूला सारून ग्रामसभेचे संचालन स्वतःकडे घेतले. असे पंचायत समिती प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. कोरम(गणपूर्ती) झाल्याने ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. विषय सूचीप्रमाणे ग्रामरोजगार सेवक पदाच्या निवडीबाबद विषयाला सुरुवात होताच ग्रामसभेत वादविवाद सुरू झाले. उपस्थित ग्रामसभा सदस्यांना शांत न करता स्वतःच क्षुल्लक कारणावरून वादविवाद वाढविण्यात आल्यामुळे ग्रामसभेचे कामकाजात बाधा निर्माण झाली. तरी उपस्थितांनी सदर विषय बाजूला सारून इतर विषयावर चर्चा करण्याची वारंवार सभाध्यक्ष तथा सरपंच पुष्पा खोटेले यांना विनंती केली. परंतु उपसरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंच महिला असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा तहकूब केली असल्याचे वास्तव समोर आले आहे. या प्रकाराने ग्रामसभा सदस्यांचा पर्यायाने गावाचा अपमान केला व ग्रामसभेच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपसरपंचासह ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी. या करिता ग्रामस्थांचे स्वाक्षऱ्यानिशी गटविकास अधिकारी पंचायत समिती साकोली यांचेकडे तक्रार करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा तसेच जिल्हाधिकारी भंडारा यांना तक्रारीच्या प्रतीलीपी पाठविण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकारी व जिल्हा प्रशासनामार्फत संबंधितांवर काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या