Ticker

6/recent/ticker-posts

निवडणूक कामकाज बिनचूकपणे पार पाडावे-जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

वर्धा मतदार संघातील मतदान पथकास प्रथम प्रशिक्षण

चित्रा न्युज ब्युरो
वर्धा: निवडणूक कामकाज हे अत्यंत जोखमीचे असून प्रत्येकाने दक्ष राहणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रिया पार पडतांना कुठली कुठली खबरदारी घ्यावी, यासाठी हे प्रशिक्षण असून प्रशिक्षणात सांगण्यात आलेल्या प्रत्येक बाबींचे काटेकोर पालन केल्यास चूक होणार नाही. मतदान पथकासोबत आपणास देण्यात येणाऱ्या लेखी सूचनांचे बिनचूक पालन केल्यास निवडणूक कामकाज अचूकपणे पार पडण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी सांगितले. 

वर्धा विधानसभा मतदार संघात मतदान घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. वर्धा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार संदिप पुंडेकर, मलिक विराणी व श्रीमती कौशल्याराणी पाटील सर्व तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 47 वर्धा विधानसभा मतदार संघ हे उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 47 वर्धा विधानसभा मतदार संघात मतदान घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण 26 व 27 ऑक्टोंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले. त्यानुसार 27 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रथम सत्र 9.00 ते दुपारी 12.30 व द्वितीय सत्र दुपारी 1.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत चरखा भवन सभागृह सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते.

चरखा भवन सभागृह येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा मतदार संघ
वर्धा दिपक कारंडे यांनी पीपीटीद्वारे मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेत मतदान घेण्याकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची काय जबाबदारी आहे, निवडणूकीबाबतच्या कायदेशीर बाबी, ईव्हीएम मशीनबाबत सर्व माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडावी, टपाली मतपत्रिका, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नव्याने झालेले बदल, अभिरुप मतदान, पथकांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सादर करावयाचे विविध नमुने अहवाल इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कार्य असल्याने निवडणुकीचे कामात सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक कारंडे यांनी यावेळी सांगितले.

ईव्हीएम मशीन हाताळण्याचे (प्रत्यक्ष) प्रशिक्षण जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा येथे  26 व 27 ऑक्टोंबर 2024 रोजी दररोज दोन सत्रात आयोजित केले आहे. जी.एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा येथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन प्रत्यक्ष हाताळण्याबाबत तसेच ईव्हीएम मशीनच्या इतर तांत्रीक बाबी, सदर मशीन हाताळतांना येणा-या अडचणीचे निराकरण याबाबत सर्व नियुक्त मतदान पथक व झोनल अधिकारी यांना मास्टर ट्रेनरद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

चरखा भवन सभागृह येथे प्रशिक्षणाच्या स्थळी अभिरुप मतदान केंद्राची निर्मीती करण्यात येऊन प्रत्यक्ष मतदान केंद्राची मतदानाचे दिवशी कशी रचना असणे, तेथे आवश्यक बाबी व इतर व्यवस्था यांचीही माहिती सर्व प्रशिक्षणार्थी मतदान पथकांना देण्यात आली. सदर प्रशिक्षणास दोन्ही सत्रात 1320 या प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रशिक्षणास भेट देऊन मतदान पथकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणास संदिप पुंडेकर, मलिक विराणी व श्रीमती कौशल्याराणी पाटील सर्व तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 47 वर्धा विधानसभा मतदार संघ हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या