Ticker

6/recent/ticker-posts

वंचितचे ओबीसी उमेदवार शिवा नरांगले यांच्या प्रचार रथावर हल्ला ; रथाच्या चालकालाही मारहाण !


प्रचारातील बॅनर्सवर असलेल्या प्रकाश आंबेडकर 
आणि गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंवर ब्लेडचे वार

चित्रा न्युज ब्युरो
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे ८८लोहा- कंधार या विधानसभा मतदार संघातील ओबीसी उमेदवार शिवा नरांगले यांच्या प्रचारथावर नांदेड जिल्ह्यातील वाका या गावात मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. या प्रचार रथावर ओबीसी वंजारी समाजाचे ड्रायव्हर होते. त्यांना तुम्ही ओबीसी ओबीसी काय करत आहात असे म्हणत मारहाण करण्यात आली आहे.

प्रचार रथावरील बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो होता. या फोटोंवर तसेच उमेदवार नरांगले यांच्या फोटोवर ब्लेड मारण्यात आले आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उस्माननगर पोलीस ठाण्यात तालुका अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करत आहेत. 

रविवारी( दि. 3नोव्हेंबर) रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना आरएसएस कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन आले होते. ओबीसी आरक्षण विरोधी शिवीगाळ करत त्यांनी जातीयवाचक शिवीगाळ सुद्धा केली होती. संजय राऊत यांच्याबाबत का बोलत आहात ? असेही धमकवणाऱ्यांनी भोसीकर यांना विचारले होते. यानंतर पुढील दिवसात अशा प्रकारचे कृत्य पुन्हा वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी उमेदवाराच्या बाबतीत घडले.

राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी स्पष्ट भूमिका घेत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले होत असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीने राज्यात अनेक ओबीसी उमेदवार उभे केले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ॲड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे ओबीसींचा त्यांना संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे आणि यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना लक्ष केले जात आहे. त्यांच्यावर भ्याड हल्ले करण्यात येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीन दिवसांपूर्वीच दवाखान्यात असताना सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या ओबीसी उमेदवारांना आता धमक्यांचे फोन येत असल्याने आणि ओबीसी उमेदवारांवर हल्ला होत असल्याने आणि त्यांच्या आरक्षणावरून त्यांना लक्ष केले जात असल्याने आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी चिंतीत झाल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी यावर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, शिवा नरांगले हे लोहा- कंधार मतदासंघांतील लोकप्रिय उमेदवार असल्याने  प्रस्थापित मराठा समाजातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. आजची बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका लक्षात घेता. ओबीसी वंचित बहुजन आघाडीकडे वळत असल्याचा धसका प्रस्थापित मराठा नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे ते गलिच्छ राजकारण करत भ्याड हल्ला करायला प्रवृत्त झाले आहेत. 

आम्ही या प्रस्थापित निजामी मराठ्यांना सांगतो की, या झुंडशाहीला आम्ही दबणार नाही, बळी पडणार नाही. आमचे उमेदवार शिवा नरांगले हे सुद्धा या राजकारणाला बळी पडणार नाहीत ते अधिक त्वेषाने लढतील. येत्या निवडणुकीत या मतदार संघातील ओबीसी समाज शिवा नरांगले यांच्या पाठीशी उभा राहून आपल्या मतदानाच्या स्वरूपात आपली ताकद दाखवून प्रस्थापित निजामी मराठ्यांना धडा शिकवणार असा विश्वासही अक्षय बनसोडे यांनी व्यक्त केला.
----


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या