चित्रा न्युज ब्युरो
परभणी – माझ्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशी द्या. सोमनाथला 4 दिवस मारले, त्याची पार हाडे मोडून त्याचा जीव घेतला, अशा शब्दांत परभणी हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर न्यायाची याचना केली आहे.
राहुल गांधी यांनी सोमवारी दुपारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या तो दलित आहे म्हणून करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सोमनाथ यांच्या आईने पत्रकारांशी बोलताना न्यायाची मागणी केली आहे.
पीडित माता पत्रकारांशी बोलताना म्हणाली, माझ्या मुलाला मारणाऱ्यांना कठोस शिक्षा द्या. त्यांना फाशी द्या अशी मागणी मी राहुल गांधी यांच्याकडे केली. आमचा न्याय लवकर करा अशी विनंती केली. त्यावर त्यांनी जी कायदेशीर कारवाई आहे ती होईल अशी ग्वाही दिली. माझ्या मुलाची मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याचा खूनच झाला. कारण, माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता. त्याला व्यसनही नव्हते. त्याला 4 दिवस मारहाण करण्यात आली. पार हाडे मोडून त्याचा जीव घेण्यात आला. या प्रकरणी संशय तर आहेच.
राहुल गांधी यांनी आम्हाला काय झाले? कसे झाले? याची विचारणा केली. त्यावर आम्ही जे घडले ते सांगितले. माझा मुलाचा मृत्यू झाल्याची गोष्ट पोलिसांनी आम्हाला 5 दिवसांनंतर सांगितली. तुमच्या मुलाचा मृत्यू झाला असून, येऊन बॉडी घेऊन जा असे ते म्हणाले. त्यानंतर आम्ही धावत येत मृतदेह ताब्यात घेतला. आता मुख्यमंत्री माझ्या मुलाचा मृत्यू दमा व हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे कसे काय सांगू शकतात? असा प्रश्न मी राहुल गांधी यांना विचारला.
0 टिप्पण्या