Ticker

6/recent/ticker-posts

पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना वाहतूक पोलिस अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; आरोपीवर गुन्हा दाखल

चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर  : -शहरातील वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी बसप्पा शिवाजी साखरे यांना पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सोलापूरच्या जेल रोड पोलिस ठाण्याजवळील ट्रॅफिक डंपयार्ड येथे करण्यात आली.

तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची बुलेट गाडी ताब्यात घेतल्यावर पोलीस कर्मचारी साखरे यांनी गाडीचा सायलेन्सर कंपनीचा नसल्याचा तसेच गाडीवर यापूर्वीचा ३,००० रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचा आरोप केला. गाडी ताब्यात घेऊन स्वतः चालवत, तक्रारदाराला पाठीमागे बसवून ट्रॅफिक डंपयार्डमध्ये आणले. यावेळी पोलीस साखरे यांनी तक्रारदाराला सांगितले की, “पूर्वीचा दंड माफ करतो, परंतु सायलेन्सरच्या कारणाने २,००० रुपये दंड भरावा लागेल.”

तक्रारदाराने पावतीची मागणी केली असता, पावती उपलब्ध नसल्याचे सांगून लवकरात लवकर पैसे देण्याची मागणी करण्यात आली. अखेर तडजोडीअंती १,५०० रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. आरोपी साखरे यांनी १,५०० रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले, पोलीस कॉन्स्टेबल गिरीशकुमार सोनवणे, सचिन राठोड आणि श्याम सुरवसे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

या प्रकरणी जेल रोड पोलिस ठाण्यात आरोपी साखरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “जर कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामांसाठी लाच मागत असेल, तर त्वरित आमच्याशी संपर्क साधावा.”
संपर्क क्रमांक: ९७६४१५३९९९, कार्यालय क्रमांक: ०२१७-२३१२६६८

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या