Ticker

6/recent/ticker-posts

सासू-सुनेच्या वादातून नराधमाचा थरार: पत्नी, सावत्र आई, पोटच्या मुलाचा खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर: सासू-सुनेच्या सततच्या भांडणांमुळे आलेल्या तणावातून एका नराधमाने पत्नी, सावत्र आई, व पोटच्या मुलाचा क्रूरपणे खून करून गावात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणात बार्शी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत न्यायप्रक्रियेला न्याय दिला आहे.  

दि. 9 फेब्रुवारी 2017 रोजी पहाटे तीनच्या सुमारास मौजे कोरफळे येथील अनिरुद्ध व्यंकट बरडे याने आपल्या घरात झोपलेल्या सावत्र आई सखुबाई आणि मुलगा सुदर्शन यांना हातोड्याने मारून जागीच ठार केले. पत्नी रेश्मावर कुकरीने हल्ला करत तिच्या शरीरावर गंभीर जखमा करून अंगावर रॉकेल ओतून पेटवले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याचवेळी त्याने मुलगा अविनाश आणि मुलगी प्रतीक्षावरही कुकरीने हल्ला केला आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.  

या भयानक घटनेनंतर आरोपीचे वडील व्यंकट पंढरीनाथ बरडे यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा क्रमांक 51/2017 अन्वये भा.द.वि. कलम 302, 307, आणि 309 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.  

तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर पवार, राजकुमार केंद्रे, आणि रवींद्र खांडेकर यांनी तपास करून सबळ पुरावे गोळा केले व आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.  

सरकारी वकील श्रीमती राजश्री कदम आणि श्री प्रदीप बोचरे यांनी आरोपीच्या बायकोचा मृत्यूपूर्व जबाब, नेत्रसाक्षीदार मुलगा व मुलगी यांची साक्ष, तसेच परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडले.  

बार्शी न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश मा. एल.एस. चव्हाण यांनी आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे याला भादविचे कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा आणि 1,00,000 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. भादविचे कलम 307 अंतर्गत 10 वर्षे कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली. दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास ठोठावण्यात आला.  

सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला कोर्ट पैरवी पोलीस हवालदार कुणाल पाटील आणि स.पो.फौ. शशिकांत आळणे यांचे सहकार्य लाभले. तसेच, मा. जालिंदर नालकुल (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी) व मा. कुंदन गावडे (पोलीस निरीक्षक, वैराग पोलीस ठाणे) यांनी फिर्यादी व साक्षीदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.  

सरकारी युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे न्यायालयाने या गंभीर प्रकरणात योग्य न्याय दिला. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या