चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर : वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2022 साली घडलेल्या खुनाच्या गंभीर प्रकरणात बार्शी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मिथुन साळवे, अखिल शेख, जुबेर शेख आणि हरि केकडे या चारही आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी चोरीच्या सोन्याच्या मुद्द्यावरून आरोपींच्या टोळीत वाद सुरू होते. या वादात पप्पू उर्फ सचिन याने हस्तक्षेप करून पोलिसांना आरोपींच्या टोळीबाबत माहिती दिली. याचा राग धरून, हरि केकडे यांच्या सांगण्यावरून मिथुन साळवे, अखिल शेख आणि जुबेर शेख यांनी लाकडी ठोकळा आणि धारदार शस्त्रांचा वापर करून पप्पू याला मारहाण केली.
पप्पू गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची फिर्याद त्याच्या भावाने वैराग पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (खून), 379 (चोरी), आणि 34 (सामूहिक जबाबदारी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजने यांनी प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपींना अटक करून कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात ठेवण्यात आले. तीन वर्षे चाललेल्या या प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली.
सरकारी पक्षाने प्रकरणात सहा साक्षीदार तपासले. मात्र, साक्षीदारांच्या साक्षांमध्ये विसंगती आणि ठोस पुराव्यांचा अभाव असल्याने न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
मिथुन साळवे, अखिल शेख आणि जुबेर शेख यांच्या वतीने ॲड. प्रशांत एडके, ॲड. सुहास कांबळे, ॲड. समाधान सुरवसे, आणि ॲड. आकाश तावडे यांनी बचाव केला. हरि केकडे यांच्या वतीने ॲड. राजकुमार नरोटे यांनी प्रभावीपणे काम पाहून न्यायालयासमोर पुराव्यांतील त्रुटी सादर केल्या.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी सर्व पुरावे आणि साक्षी तपासून युक्तिवाद ऐकून घेतला. त्यांनी सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरल्याने आरोपींना निर्दोष मुक्त केले.


0 टिप्पण्या