चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-बार्शी-येडशी परिसरात आलेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील १० जणांचे तज्ज्ञ पथक रविवारी रात्री उशिरा सोलापूरमध्ये दाखल झाले. सोमवारी, १३ जानेवारीपासून वाघाच्या सवयींचा अभ्यास करून मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे. वाघ जातो कुठे, खातो काय आणि त्याच्या हालचालींचा अभ्यास करून त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे.
यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतर पार करत हा वाघ बार्शी-येडशी परिसरात पोहोचला आहे. मात्र, या परिसरात त्याचे नैसर्गिक आवास नसल्याने त्याला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाच्या नागपूर मुख्यालयातून परवानगी मिळाल्यानंतर ताडोबा येथील तज्ज्ञांचे पथक रविवारी रात्री सोलापूर येथे आले आहे.
ताडोबा येथून आलेल्या पथकाचे नेतृत्व डॉ. रवींद्र खोब्रागडे आणि अजय मराठे करणार आहेत. डॉ. खोब्रागडे हे वैद्यकीय तज्ज्ञ असून त्यांना ६० हून अधिक वाघ पकडण्याचा अनुभव आहे, तर अजय मराठे हे सशस्त्र शार्प शूटर असून अचूक निशाण्याने डार्टच्या मदतीने वाघाला बेशुद्ध करण्याचा त्यांचा हातखंडा आहे.
सोमवारी पथक वाघाच्या वावराचे ठिकाण तपासून त्याच्या हालचालींचा अभ्यास करेल. वाघ कुठे जातो, किती खातो, काय खातो यासारख्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला भूल देण्यासाठी आवश्यक औषधाची मात्रा निश्चित केली जाईल. त्यानंतर परिस्थितीनुसार वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवले जाईल.
"वाघाला जेरबंद करताना सर्व काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनी घरात राहून पथकाला सहकार्य करावे. गर्दी केल्यास वाघाला पकडणे अधिक कठीण होऊ शकते," असे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी स्पष्ट केले आहे.
ताडोबाच्या पथकात दोन महत्त्वाचे तज्ज्ञ सहभागी आहेत.
1. डॉ. रवींद्र खोब्रागडे: वैद्यकीय तज्ज्ञ असून त्यांनी आतापर्यंत ६० हून अधिक वाघ पकडले आहेत.
2. अजय मराठे: शार्प शूटर आणि सशस्त्र पोलीस, अचूक निशाण्याने डार्टद्वारे वाघाला बेशुद्ध करण्याचा त्यांचा अनुभव उल्लेखनीय आहे.
बार्शी-येडशी परिसरातील नागरिकांनी मोहिमेस सहकार्य करून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. वन विभागाने सर्व यंत्रणा कार्यान्वित करून वाघाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.


0 टिप्पण्या