Ticker

6/recent/ticker-posts

विधीतज्ज्ञांच्या घडवणूकीसाठी उत्तम विधी महाविद्यालयांची नितांत गरज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन 

चित्रा न्युज ब्युरो
नागपूर : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सवोच्च स्थान आहे.  न्यायव्यवस्था हा सर्वात महत्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्याय व्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालय व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर, प्राचार्य डॉ रविशंकर मोर, रजिस्ट्रार डॉ राजू हिवसे यांची प्रमूख उपस्थिती होती.

मी जे काही घडलो त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा वाटा खुप मोठा आहे. येथील गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाच्या बळावर एक आमदार ते मुख्यमंत्री म्हणून कायदेमंडळाच्या प्रतिनिधीत्वाची  महत्वपूर्ण जबाबदारी मी विश्वासाने सार्थ करु शकत असल्याच्या कृतार्थ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. कायदेमंडळाचा प्रतिनिधी म्हणून कायदेविषयक संकल्पना या अतिशय सुस्पष्ट माहित असणे आवश्यक आहेत. त्याबळावर आमदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये मला उत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार मिळाला असे त्यांनी सांगितले.  

ज्ञानाच्या परिभाषा या कृत्रिम बुध्दीमत्तेच्या पार्श्वभूमीवर वेगाने बदलत आहेत. सर्वच ज्ञान शाखांना हे आव्हान आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाचा चपखल उपयोग आपण केला पाहिजे.  न्याय प्रणालीला यातून गती मिळू शकते हे आपण समजून घेतले पाहिजे. न्यायव्यवस्था जर उत्तम हवी असेल तर उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालय व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये यादृष्टीने चांगल्या तीन लॉ स्कुल अर्थात विधी महाविद्यालय उभारण्याचे भाग्य मला मिळाले. न्यायमूर्ती  सिरपूरकर यांच्या पुढाकाराने इथे आपण नॅशनल लॉ स्कुल उभारू शकलो, असे ते म्हणाले.

शंभर वर्षाचा वैभवी वारसा असलेल्या या महाविद्यालयाच्या नवीन वास्तुला शासनातर्फे  सर्वोतोपरी मदत करु. यात कोणतीही कमतरता आम्ही पडू देणार नाही. या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून  मला उपस्थित रहातांना मनस्वी आनंद झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.  

लोकशाही मूल्यांमध्ये सर्वांत महत्वाचे मूल्य हे संविधानातील मूलभूत तत्वात आहे. या मूलभूत तत्वांवरच सर्वांना न्यायाची हमी आहे. वेळेत न्याय मिळणे यातच लोकशाहीच्या सक्षमीकरणाचा मार्ग दडला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. प्रबोधन, प्रशिक्षण, संशोधन यात त्रिसुत्रीवरच कोणत्याही शिक्षण संस्थांचा पाया भक्कम होत जातो.  बदलते तंत्रज्ञान याचा विधी प्रक्रियेत जितका चांगला उपयोग होईल त्या प्रमाणात दीर्घकाळ चालणारे न्यायालयीन प्रकरणे तत्काळ मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी महाविद्यालयातून घडलेल्या न्यायमूर्तींचा गौरवाने उल्लेख केला. चांगल्या शिक्षणसंस्था या समाजाच्या संमृध्दीचे द्योतक असतात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य  डॉ. रविशंकर मोर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या