बार्शीत लाचखोरीचा पर्दाफाश
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :– गुन्ह्याची चार्जशीट दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदार आणि पोलीस पाटलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार सर्जेराव गायकवाड आणि पोलीस पाटील राहुल रमेश उंबरे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या चौकशीत चार्जशीट दाखल करण्याच्या प्रक्रियेत पोलीस हवालदाराने लाचेची मागणी केली. त्यासाठी संबंधित पोलीस पाटलाच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधण्यात आला.
दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:43 वाजता, पोलीस पाटील राहुल रमेश उंबरे यांनी फिर्यादीला फोन करून "तुमच्या गुन्ह्याची चार्जशीट दाखल करण्यासाठी काही खर्च करावा लागेल, तुम्ही पोलीस हवालदार गायकवाड यांना भेटा" असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात हवालदार गायकवाड यांना भेटले असता, त्यांनी चार्जशीट दाखल करण्यासाठी 10,000 रुपये लाचेची मागणी केली.
फिर्यादीने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करण्यासाठी बार्शी-कुईवाडी रोडवरील जैन मंदिराजवळ बैठक घेतली. या दरम्यान, फिर्यादीने हवालदार गायकवाड यांची भेट घेतली असता, गायकवाड यांनी लाच रक्कम 10,000 वरून 5,000 रुपये करण्याची तयारी दर्शवली आणि ती पोलीस पाटील उंबरे यांच्याकडे द्यावी लागेल, असे स्पष्ट केले.
त्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध सापळा रचून लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात पकडले.
सदर प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7, 7A आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे कारवाई होणे, ही संपूर्ण विभागासाठी मोठी नामुष्कीची बाब मानली जात आहे.
सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याची सखोल चौकशी केली जात आहे.
लाचखोरीसारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. अशा प्रकरणांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यास भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई होऊ शकते.


0 टिप्पण्या