चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- बार्शी शहरात एका तरुणाने बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने कारवाई करत पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजता बार्शी शहरातील टिळक चौक येथे आरोपी राजू गोरख कनगिरे (वय ३० वर्षे, रा. टिळक चौक, बार्शी, जि. सोलापूर) हा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मारुतीराव आकुलवार यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून २,००० रुपये किमतीची लोखंडी धारदार तलवार जप्त केली आहे. सदर तलवार २७ इंच लांब आणि १.२५ इंच रुंद असून टोकाकडे निमुळती होत जाणारी आहे. तसेच तलवारीला पितळी मुठ असून तिची लांबी ५ इंच आहे, त्यामुळे तलवारीची एकूण लांबी ३२ इंच इतकी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राजू कनगिरे याने सार्वजनिक ठिकाणी तलवार बाळगून कायद्याचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार १६४ डबडे हे करत आहेत.
बार्शी शहरात अवैध शस्त्रे बाळगण्याच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
0 टिप्पण्या