चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे- येथील भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण दिलीप नवले (रा. फ्लॅट नंबर ३०१, बी विंग, सन युनिव्हर्स सोसायटी, नवले ब्रिज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. करण नवले हा भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा आहे.याबाबत २८ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नुकताच (दि. १९ मार्च) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीचा एक व्यवसाय असून ती आंबेगाव परिसरात राहण्यास आहे. करण नवले याची आणि पीडितेची २०२१ मध्ये एका जीममध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटणे बोलणे सुरू होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले.दरम्यान, काही दिवसाने पीडितेने करणला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला करणचे इतर मुलींशी प्रेमसंबध असल्याचा संशय आल्याने तिने विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर त्याने तिला मारहाण केली. मारहाणीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घडलेला सर्व प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्यावर त्याच्या आईने ‘तू माझ्या मुलाचे वाटोळे केले आहे, तुझ्यापर्यंत पोहचायला मला पाच मिनिटे लागणार नाहीत, तू या परिसरात राहायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील,’ अशी धमकी दिली.
त्यानंतर करणने पुन्हा पीडितेला गळ घालून ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे. थोडासा वेळ दे’ असं म्हणत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्याने घरचे आता लग्नासाठी ऐकणार नाहीत म्हणत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतर २०२४ मध्ये तरुणी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत घरी सांगण्यास सांगितले. दरम्यान, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आळंदीत त्यांनी लग्न केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
0 टिप्पण्या