Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्याने केलापाणी येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट


समस्या सोडविण्याचे जिल्हाधिका-यांचे आश्वासन


चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही नंदूरबार जिल्ह्य़ातील धडगांव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाढवावरून माल वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी बाम्बुलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते.१५ दिवसापूर्वी झोळीतून दवाखान्यात नेतांना एका नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या गांवात दवाखाना नाही,रस्ता नाही,शाळा नाही,अंगणवाडी नाही,वीज नाही,पाणी नाही.अजूनही मूलभूत सुविधा या गांवात पोहचल्याच नाहीत. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासाठी करोडो निधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्रीच दाखवते,परंतू प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी,ह्या योजना जातात तरी कुठे? लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करतात की काय? असा सवाल सुशिलकुमार पावरा यांनी उपस्थित केला होता.केला पाणी  येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांना  दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी देण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी  झालेल्या बैठकीत सुशिलकुमार पावरा यांनी केलापाणी येथील समस्या रोखठोक मांडल्या होत्या.तसेच कालापाणी ते हेंगलापाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा, या मागणीसाठी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
               केलापाणी येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.गाढवावरून डोंगरद-यातून पाणी आणावे लागत आहे.या समस्यांचे  वास्तविक चित्र वृत्तपत्र व टिव्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झाले होते.हे सगळे बघून जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी काठीचा आधार घेत घेत डोंगराळ भागातील बिकट वाटेने पायपीट करीत अधिका-यांसोबत १ मार्च २०२५ रोजी केलापाणी गाठले.तेथे ग्रामस्थांशी प्रत्यक्षात संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.महिला ज्या ठिकाणाहून पाणी आणण्याची कसरत करतात, तेथील विहीरीचीही पाहणी केली.आदिवासी महिलांशी हितगुज केली.सगळ्या समस्या जाणून घेतल्यानंतर कालापाणी ते हेंगलापाणी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल व गांवात शाळा,अंगणवाडी,पाणी,वीज, आरोग्य सुविधा पोहचवले जातील, असे गांवक-यांना आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले.बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून गांवातील समस्यांवर सातत्याने पाठपुरावा सुरूच राहिल्याने जिल्हाधिकारी ह्या प्रत्यक्षात केलापाणी या गांवात आल्या,म्हणून गांवक-यांनी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी व बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या