Ticker

6/recent/ticker-posts

ॲट्रॉसिटी प्रकरणात तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर: माढा तालुक्यातील तडवळे गावात ६ मे २०२२ रोजी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले. बार्शी येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मे. व्ही. के. मांडे यांनी पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता जाहीर केली. या निकालामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.

युवराज परबत, विजयराज परबत आणि ऋषिकेश परबत यांच्याविरोधात फिर्यादीच्या तक्रारीवरून माढा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४ व ३४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी आणि त्यांचा भाऊ तडवळे गावातील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहात पंगतीत जेवत असताना जातिवाचक शब्द वापरत आरोपींनी त्यांचा अपमान केला, असा आरोप फिर्यादीने केला होता. तसेच, घरी परतत असताना आरोपींनी मारहाण करत कमरेवर आणि पोटाखाली लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून बार्शी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

बार्शी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे फिर्यादीसह चार महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरचे पुरावे आणि उपलब्ध दाखले यांची सखोल छाननी केली असता, आरोप सिद्ध होण्यास पुरेशी आधारभूत माहिती मिळू शकली नाही. परिणामी, न्यायालयाने तिन्ही आरोपी निर्दोष असल्याचे घोषित केले.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत एडके, ॲड. सुहास कांबळे, ॲड. समाधान सुरवसे, ॲड. आकाश तावडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांनी न्यायालयात भक्कम तर्क मांडत फिर्यादीचे आरोप तर्कसंगत नाहीत, तसेच कोणताही ठोस पुरावा नाही, हे स्पष्ट केले.

या निकालानंतर आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. तसेच, ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी या प्रकरणावरून महत्त्वाचा संदेश मिळाल्याचे काही नागरिकांनी नमूद केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खोटी तक्रार दाखल करून निर्दोष व्यक्तींना गुन्हेगार ठरवण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या