चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडे चौक, दत्त बोळ येथील उदय लॉजवर छापा टाकून अवैध वेश्या व्यवसायाला आळा घातला आहे. या कारवाईत ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दमदार करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी रचलेल्या सापळ्याद्वारे यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गोपनीय माहिती मिळाली होती की, उदय लॉजचा मालक आनंद रमेश माने (वय ४२, रा. लोकमान्य चाळ, बार्शी) आणि लॉजचा मॅनेजर सुनिल ऊर्फ तात्या काशीनाथ माने (वय ६०, रा. लोकमान्य चाळ, बार्शी) हे महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अवैध वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून १ एप्रिल २०२५ रोजी उदय लॉजवर छापा टाकला. या कारवाईत ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी सरकारतर्फे मसपोफी सविता सुरेश कोकणे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी फिर्याद दाखल केली. आरोपी आनंद रमेश माने आणि सुनिल ऊर्फ तात्या काशीनाथ माने यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३(२), १४४(२), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३, ४, ५, ६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ३२७/२०२५ असा नोंदवला गेला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीण) करत आहेत.
दोन्ही आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, बार्शी यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. या कालावधीत पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) दिपक चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक रणजीत माने, मसपोफी सविता कोकणे, पोहेकॉ सचिन वाकडे (४४७), पोहेकॉ सुर्यकांत जाधव (८३२), पोहेकॉ प्रवीण वाळके (१७६), चापोहेकॉ रजाक कालेखान (१७२७), पोकॉ शिवाजी माळी (२१९४), मपोकॉ प्रीती पाटील (२२३८) यांच्यासह बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि समीर ढोरे, सपोनि प्रदिप झालटे, पोसई अजय माखने, पोसई उमाकांत कुंजीर, मपोसई सोनम जगताप, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ अमोल माने (१६६७), पोकॉ सचिन देशमुख (१९७४) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने या कारवाईद्वारे अवैध मानवी वाहतुकीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा संदेश दिला आहे. नागरिकांना अशा गैरप्रकारांची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी ई-मेल आयडी: sp.solapur.r@mahapolice.gov.in आणि फोन नंबर: ०२१७/२७३२००१ उपलब्ध आहेत.
0 टिप्पण्या