Ticker

6/recent/ticker-posts

सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शीने सुनावली शिक्षा


सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शीने सुनावली शिक्षा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर –: दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी टेंभुर्णी येथील कुईवाडी चौकात टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र ठोंबरे, बाळराजे घाडगे आणि सिद्धेश्वर कोडलिंगे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना एक घटना घडली. दुपारी 1:20 वाजण्याच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीचे पीकअप वाहन (क्रमांक MH-45/AF-3222) चालवणारा चालक मोबाईल फोनवर बोलताना दिसला. पोलीस नाईक ठोंबरे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु चालकाने वाहन न थांबवता पुढे नेले. त्यामुळे ठोंबरे यांनी सहकारी पोलीस कोडलिंगे यांना मदतीसाठी बोलावले. दोघांनी मिळून चालकाला रस्त्याच्या कडेला वाहन थांबवण्यास सांगितले.  

वाहन थांबल्यानंतर चालकाला परवाना आणि वाहनाची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले असता, त्याने स्पष्ट नकार दिला. यावेळी चालकाने आरेरावी करत ठोंबरे यांना उद्देशून, "तू आम्हाला का विचारतोस? आम्ही गेली पंचवीस वर्षे हे काम करतोय, आम्हाला पोलीसांना कसं हाताळायचं हे माहीत आहे," असे म्हणत मोठ्याने बोलायला सुरुवात केली. तसेच, "माझा टेम्पो इथेच सोडतो, मला कुठे न्यायचं ते न्या," असे आर्वाच्य भाषेत बोलून पोलिसांना शिवीगाळ केली. ठोंबरे हे चलन पावती लिहीत असताना चालकाने त्यांना धक्का मारून ढकलले आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला.  

या घटनेनंतर आरोपी शंकर मच्छिंद्र नवगिरे (रा. माळेगाव, ता. माढा) याच्याविरुद्ध पोलीस नाईक राजेंद्र ठोंबरे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोसले यांनी तपास करून आरोपीविरुद्ध पुरावे गोळा केले आणि मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.  

सरकार पक्षातर्फे या खटल्यात चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. फिर्यादी आणि साक्षीदारांच्या साक्षी, तसेच तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे सरकारी वकील श्रीमती राजश्री कदम यांनी न्यायालयात प्रभावीपणे मांडले. या पुराव्यांचा विचार करून मा. जिल्हा न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी आरोपी शंकर मच्छिंद्र नवगिरे याला दोषी ठरवले. त्याला भा.द.वि. कलम 353 अंतर्गत 8 दिवसांचा कारावास आणि 5,000 रुपये दंड, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 117 अंतर्गत 1,200 रुपये दंड, तसेच मोटार वाहन कायदा कलम 250, 177 अंतर्गत 500 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.  

या खटल्यात सरकार पक्षातर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी यशस्वीपणे काम पाहिले. तसेच, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन करून त्यांना वेळोवेळी न्यायालयात हजर ठेवले. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी फिर्यादी व साक्षीदारांना आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या