Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्यासह बारा जणांचा भीमपुत्र आयडॉल पुरस्कार देऊन गौरव


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज : संविधान विचार मंचच्या वतीने आयोजित भीमपुत्र आयडॉल 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार अकलूज येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्यासह अकरा जणांना देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी बारामती येथील गदिमा सभागृह, विद्या प्रतिष्ठान, एमआयडीसी येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष खासदार सुनेत्रा पवार आणि माजी खासदार डॉ.नरेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

या कार्यक्रमात विशेष पुरस्कारासाठी डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांनी गेली 33 वर्षापासून बॉटनिकल गार्डन, नक्षत्र गार्डन, पर्यावरण संवर्धन, वृद्धाश्रम व एड्स ग्रस्तांसाठी केलेली मदत, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक यासह महिला सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान अशा विविध उपक्रमांद्वारे समाजात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन  राजेश कांबळे (अध्यक्ष), घनश्याम केळकर (सचिव) व मोहन गायकवाड (समन्वयक) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. प्रा. संतोष जगताप, रूपाली गायकवाड, सुर्यकांत मोरे, सिद्धार्थ चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी संविधानाच्या मूल्यांची जोपासना करत नव्या पिढीसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा संदेश दिला. भीमपुत्र आयडॉल हा उपक्रम भविष्यातही नवनवीन कार्यकर्त्यांना समाजासाठी झटण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

यावेळी समाजसेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण व पर्यावरण यासह विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या कल्पना सरोज, देवांश धनगर, डॉ. मुरहरी केळे, राजेश चंद्रा, शेख चांद पाशा, सुमन धामणे, सीए शंकर अदानी, हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे, डॉ.रोहन अकोलकर, मारुती बनसोडे, पांडुरंग सोनवणे यांनाही भीमपुत्र आयडॉल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या