Ticker

6/recent/ticker-posts

वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे भ्रष्टाचार:म्हणूनच त्या विरोधात मतदान; संजय राऊतांचे स्पष्टिकरण; अमित शहा यांच्यावरही निशाणा

चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई- वक्फ बोर्डाच्या जमिनी आम्ही विक्री करू, असे काल अमित शहाच्या तोंडून निघाले, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कालपर्यंत आम्ही वक्फच्या संपत्तीला हात लावणार नाही, आम्ही त्याचे रक्षण करते आहोत, असे ते सांगत होते. मात्र, त्यांच्या तोंडून काल नकळत खरे बाहेर पडले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीतून त्यांना पैसे मिळवायचे आहेत. या जमिनीचा त्यांना व्यापार करायचा आहे. दोन लाख कोटी रुपयांच्या वरती या जमिनी आहेत. त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच हे विधेयक मंजूर करण्यात आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वक्फ बोर्ड मध्ये होणारा हा भ्रष्टाचार आहे. आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरोधातच मतदान केले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

वक्फ बोर्ड संदर्भातील आमच्या पक्षाच्या भूमिकेविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. ते या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातील भूमिकेवर स्पष्टपणे बोलणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाले, या माध्यमातून देशभरात फार मोठी क्रांती करत आहोत, अशा प्रकारचे वातावरण तयार करण्यात आले. मात्र, ते बिल मंजूर झाले आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या बिलामुळे या देशांमध्ये काय होणार? यापूर्वी काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा सर्व व्यवहार मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. गरीब मुसलमानांचा यातून उद्धार होणार आहे, अशी भाषा काल सरकारच्या वतीने करण्यात आली. ही पूर्णपणे धुळफेक असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

२०२५ पर्यंतच्या मशिदी, दर्गा यांना आम्ही हात लावणार नाही. मात्र रिक्त जमिनीची विक्री करणार असल्याचे अमित शहा यांनी काल लोकसभेत सांगितले. म्हणजेच ते खरेदी विक्रीच्या मुद्द्यावर आले आहेत, अशा प्रकारे संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या तोंडातून नकळत हे सत्य बाहेर पडले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वक्फ बोर्डाच्या मोकळ्या जमिनीची किंमतच दोन लाख कोटी रुपये आहे. त्यांचा सौदा करण्याची भाषा काल त्यांनी केली. त्यांच्या पोटात जे होते ते काल बाहेर आले. या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार? आणि कशा पद्धतीने विकणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. धारावी आणि मुंबईतील विमानतळ आणि देशभरातील विमानतळे विकल्या गेले आहेत. या देशात विक्री करणारे देखील दोघेच आहे आणि खरेदी करणारे देखील दोघेच आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी होता. मात्र जय शहा हे क्रिकेटचे सूत्रधार झाले, त्यानंतर क्रिकेट हा देशाचा राष्ट्रीय खेळ झाला आहे. त्यामध्ये देखील हिंदू मुसलमान केले जात आहे. देशात हिंदूंच्या विरुद्ध हिंदूला लढवले जाते आणि मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिमांना लढवले जात आहे. या माध्यमातून हा नवा राष्ट्रीय खेळ या लोकांनी सुरू केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल विधेयकावर झालेली भाषण ऐकल्यानंतर त्यामध्ये केवळ संपत्ती – संपत्ती – संपत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला झोपेत देखील संपत्ती दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. मग ती संपत्ती ही धार्मिक असो की राष्ट्राची असो, सरकारला केवळ सर्व संपत्ती दिसत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या