Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात सासरच्या मंडळींकडून कोयत्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण; अक्कलकोट पोलिसांकडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल



चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापुर– सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून कोयत्याने डोक्यात आणि लोखंडी रॉडने पायांवर मारहाण करून एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा शणप्पा नाटेकर (वय 38, रा. पिंपरी, पुणे) हे त्यांच्या सासरी, मौजे आळगे (ता. अक्कलकोट) येथे दि. 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता आपल्या पत्नी राणी कृष्णी नाटेकर आणि मुलगा अश्विक यांना घरी आणण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांच्यावर नियोजितपणे प्राणघातक हल्ला करण्यात आला.

फिर्यादींच्या जबाबानुसार, त्यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. वादावादी सुरु असतानाच मेहुणा गिरीष कोळी यांनी कृष्णा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पत्नी राणी हिने कोयत्याने त्यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सासरे पंडित कोळी, सासू शरणव्वा कोळी यांनी देखील शिवीगाळ केली. दरम्यान, गिरीष कोळी यांचे ओळखीचे नवनाथ निंबाळ या व्यक्तीने लोखंडी रॉडने कृष्णा यांच्या दोन्ही पायांवर वार करत त्यांना गंभीर जखमी केले.

हा प्रकार घडल्यानंतर मावस भाऊ शिवशरण वालीकर यांनी त्यांना तातडीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4.10 वाजता FIR नं. 0214 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(2), 115(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 351(2), आणि 352 अन्वये संबंधित आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक महेश रामेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, याप्रकरणी आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

गुन्ह्यातील संशयित व्यक्ती –

1. राणी कृष्णी नाटेकर
2. गिरीष पंडित कोळी
3. नवनाथ निंबाळ
4. पंडित कोळी
5. शरणव्वा कोळी – सर्व रा. मौजे आळगे, ता. अक्कलकोट



या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून एखाद्याच्या जीवावर उठण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या