इंदिरानगर, माजलगाव येथे मध्यरात्रीची घटना; पोलिसांनी घेतली तात्काळ कारवाई
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-माजलगाव शहरातील इंदिरानगर परिसरात घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या तरुणास घरमालकाने मध्यरात्री रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी (१६ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत चोरट्याला अटक केली आहे.
विलास तुळशीराम भाग्यवंत (वय ३९, व्यवसाय मजुरी, रा. इंदिरानगर, माजलगाव) हे आपल्या कुटुंबासह घरी झोपले होते. उष्णतेमुळे त्यांनी खोलीचा दरवाजा उघडा ठेवला होता. पहाटे १२.२० च्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या पायाला स्पर्श झाला आणि ते जागे झाले. त्यांनी पाहिले असता, एक अनोळखी तरुण त्यांच्या घरात शिरलेला होता.
भाग्यवंत यांनी आरडाओरडा करताच त्यांची पत्नीही जागी झाली. चोरटा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच भाग्यवंत यांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षावर (११२) फोन करून पोलीस पाचारण करण्यात आले. माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्यास ताब्यात घेतले.
तपासात त्या चोरट्याची ओळख साहील सुधाकर जावळे (रा. इंदिरानगर, माजलगाव) अशी पटली आहे. त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत कलम ३०५, ३३१(४) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रामेश्वर मुरलीधर खेत्रे हे करत आहेत.


0 टिप्पण्या