Ticker

6/recent/ticker-posts

अनगर येथे भोगावती नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; एक लाखोंच्या मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात


चित्रा न्युज प्रतिनिधी 

सोलापूर— भोगावती नदीपात्रातून विना परवाना वाळू उपसा करणाऱ्या एका वाहनाला मोहोळ पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी चालकाविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक महादेव दासराव रोडे (पो.कॉ.1877) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांचे सहकारी होमगार्ड खंडागळे आणि वजिरनाथ हे नाईट राउंडवर असताना, बाजारतळ अनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद वाहन दिसले. त्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला, मात्र ते काहीसे पुढे जाऊन थांबले. चौकशीअंती वाहनचालकाने आपले नाव सुग्रीव पांडुरंग जाधव (वय 30, रा. नरखेड, ता. मोहोळ) असे सांगितले.

त्याच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन ब्रास वाळू भरलेली आढळली. मात्र त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना, रॉयल्टी पावती आढळली नाही. वाहन क्रमांक MH-05-K-9661 असून, ते टाटा 1109 मॉडेलचे पांढऱ्या रंगाचे टिपर वाहन आहे. पोलिसांनी सदर वाहनासह वाळूसाठा जप्त केला असून, ते मोहोळ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9 आणि 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस निरीक्षक हेमंत गनपत शेडगे यांच्या आदेशानुसार मा. पोलीस नाईक तरटे हे करीत आहेत.

सदर प्रकरणामुळे नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसाला आळा बसणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. अवैध वाळू उपसामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून, या बाबतीत कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या