विभागीय आयुक्तांनी केले जिल्हाधिकारी पापळकरांचे अभिनंदन!
चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे : धुळे जिल्ह्यात जमीन महसूल व गौण खनिज उत्खननापोटी सन 2024-25 या आर्थिक वर्षात 70 कोटी 63 लाख रुपयांची वसुली करुन उद्दीष्टाच्या 116 टक्के काम केल्याबाबत नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.
सन 2024-2025 या आर्थिक वर्षाकरीता जमीन महसूल व गौणखनिज उत्खननासाठी धुळे जिल्ह्यास एकूण 60 कोटी 39 लाख रुपयांचे उद्दीष्ट निश्चीत करुन देण्यात आलेले होते. त्यापोटी महसूल यंत्रणेने 70 कोटी 63 लाख रुपये शासकीय वसुली करुन उद्दिष्टाच्या 116.96 टक्के काम पूर्ण केले आहे.
विभागीयआयुक्त यांनी अभिनंदन पत्रात म्हटले आहे की, राज्यातील एकूण 6 विभागांपैकी नाशिक विभाग हा अतिशय वैविध्यता असलेला विभाग आहे. अतिशय समृध्द बागायती भागापासून ते पर्जन्यछायेच्या व सर्वात कमी पाऊस पडणा-या जिरायती भाग असलेल्या भागाने समाविष्ठ असलेला हा विभाग, विविधतेने नटलेल्या या विभागातील सर्व महसूली यंत्रणेच्या प्रयत्नांनी नाशिक विभागाने शासनाने जमीन महसूल व गौणखनिज या लेखाशिर्षाखाली ठरवून दिलेले वसुलीचे 735.82 कोटी रुपयाचे वार्षिक उद्दीष्ट साध्य करुन 785.46 कोटी म्हणजेच 106.75 टक्के वसुली केली आहे.
महसूल उद्दिष्ट लक्षात घेता, जिल्हाधिकारी श्री. पापळकर आणि आपल्या अधिनस्त यंत्रणेने वसुलीचे प्रभावी नियोजन व त्याची परिणामकारक अंमलबजावणी करुन आपल्या जिल्ह्यास दिलेल्या वसुलीच्या उद्दीष्टापेक्षा अधिक वसुली केली, त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि महसुल यंत्रणेचे विभागीय आयुक्त डाॅ. गेडाम यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या