Ticker

6/recent/ticker-posts

संजय शिरसाटांकडे वेदांत हॉटेलची जागा विकत घेण्यासाठी 67 कोटी आले कुठून? संजय राऊतांचा प्रश्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेने केलेले आरोप मागे घेतले असले तरी संजय शिरसाट यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय शिरसाट यांनी आता प्रॉपर्टी खरेदीत घोटाळा केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वेदांत हॉटेलची जागा अत्यंत कमी किमतीत बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून 76 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतकेच नाही तर 76 कोटी रुपये संजय शिरसाट यांच्या मुलाकडे आले कुठून? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल वेदांताची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. ही जागा भ्रष्ट मार्गाने मंत्री शिरसाट यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. 67 कोटी रुपयांना ही प्रॉपर्टी घेण्यात आली. हा आकडा देखील कमी नाही. गोरगरिबांना मदत करणाऱ्या खात्याच्या मंत्रांच्या मुलाकडे एवढे पैसे कसे आले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी या महाशयाने विकत घेतली आहे. लिलावामध्ये प्रॉपर्टी विकत घेण्यात आली असली तरीही प्रॉपर्टी त्यांनाच मिळावी मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत ही प्रॉपर्टी मिळावी अशी ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवण्यात आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

प्राइम लोकेशनची ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली. त्याचे पैसे कुठून आले? त्याचे पैसे एकनाथ शिंदे यांनी दिले की अमित शहा यांनी दिले? की त्यांना मिळालेल्या 50 खोके मधील हा पैसा आहे का? संजय शिरसाट यांना इतर आमदारांपेक्षा जास्त पैसे मिळाले का? असे अनेक प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. शिरसाट यांचा मुलगा मोठा उद्योजक नाही. तरी त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र पक्ष नाही. तो अमित शहा यांचाच पक्ष आहे. त्यामुळे ही एकच थाळी आहे. यात सगळे मिळून खात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्व लुटीचा माल वन विंडो सिस्टीमने एकाच ठिकाणी आणण्यात येतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कंपनीचे मालक देखील अमित शहा हेच आहेत. त्यामुळे वाटा-घाटा हे सर्व वरवर चाललेले आहे. शेवटी ते सर्व एकाच ताटातले पदार्थ असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपावरून महा-युतीत सुरु असलेल्या चर्चेवर राऊत यांनी टीका केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती. ती परत मिळवण्याचा सरकार प्रयत्न करत आहेत, ही स्वागतार्ह बाब असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हा आपला ठेवा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहते घर ताब्यात घेतले आणि तेथे मेमोरियल उभे केले. आम्ही त्याचे देखील स्वागत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. वीर सावरकरांची पदवी, जी ब्रिटिशांनी जप्त केली होती. ती परत आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केली आहे. त्याला कोणीही विरोध करण्याचे कारण नाही. वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच. ब्रिटिशांनी तो कागदाचा तुकडा जप्त केला असला तरी देखील आम्ही त्यांना बॅरिस्टर मानतोच. मात्र या देशाची मागणी वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आहे. या वेळेला तरी सावरकरांना भारतरत्न भेटेल असे आम्हाला वाटत होते. मात्र त्यासाठी आम्ही किती काळ वाट पाहावी? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटणारे नरेंद्र मोदी यांचे दंड पिचके आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी नारायण राणे यांना विचारला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दम भरताच भारतीय सैन्यांना परत का बोलावले? हे नारायण राणे यांनी आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात संजय राऊत यांनी राणे यांच्यावर देखील पलटवार केला आहे. पाक व्याप्त कश्मीर आम्ही ताब्यात घेणार, अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली होती. त्याचे उत्तर आधी नारायण राणे यांनी द्यावे. आम्ही पाकिस्तान मध्ये गेलो नाही. तर नरेंद्र मोदी हेच नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेले होते. हे नारायण राणे विसरलात का? असा प्रश्न त्यांनी केला. नारायण राणे यांनी आता आपल्या वयाचे तरी भान ठेवावे. त्यांच्या टोपाचेही केस आता पिकले आहेत. त्यांनी प्रगल्भ विधाने करावीत. तुम्ही स्वतःचा पक्ष काढून दंडावरचा बेडूक दाखवला असता तर आम्ही तुम्हाला मानले असते. मात्र तुम्ही भाजपचे आश्रित आहात. तर राज ठाकरे यांच्याकडे स्वतःचा पक्ष असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या