चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व अचानक युद्धविराम का केला? डोनाल्ड ट्रम्पच्या धमक्यांना घाबरून युद्धविराम केला का? याची उत्तरे भाजपा सरकारला द्यावी लागतील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
नांदेडमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जय जवान जय किसान जय हिंद रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, खा. प्रा. रविंद्र चव्हाण, खा. डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल सत्तार, माधवराव पाटील जवळगावकर, सुरेश गायकवाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालो होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या वीर जवानांनी साहस दाखवले त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्ध, चीन विरोधातील युद्ध, कारगील युद्ध, १९४८ चे युद्धातील शहीद, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, महात्मा गांधी व पहलगावमध्ये शहीद झालेले पर्यटक या सर्वांना अभिवादन करण्यासाठी ही रॅली आहे. देशाच्या सीमेवर जवान लढत आहे तर आपला बळीराजा येथे जमीन कसतो व सर्वांचे पोट भरतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षाने या रॅलीचे आयोजन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात तीन दिवस होते, नांदेडमध्येही त्यांनी एक सभा घेतली पण यावेळी अमित शाह यांनी निवडणूक प्रचारावेळी शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणांना २१०० रुपये देणार, दोन सिलिंडर मोफत देणार यावर काहीच बोलले नाहीत. अचानक युद्धबंदी का केली त्यावर बोलले नाहीत. अमेरिकेच्या दबावाबद्दल काहीच बोलले नाहीत आणि फक्त काँग्रेसवर बोलले. अमित शाह व भाजपाला काँग्रेसवर बोलण्याचा काही अधिकार नाही. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, इंदिराजी गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली. राजीव गांधी व इंदिराजी गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. पण भाजपा व मुस्लीम लिग यांचा पुराना रिश्ता आहे. भाजपाच्या वैचारिक पूर्वजांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या पक्षाबरोबर युती करून सरकारे स्थापन केली होती, श्यामा प्रसाद मुखर्जी या सरकारमध्ये मंत्री होते. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला हे सर्वांना माहित आहे. भाजपा व रा. स्व. संघाचे स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान नाही. देशाच्या तिरंगा झेंड्याची यांना ऍलर्जी आहे. ५० वर्ष संघाच्या कार्यालयावर तिरंगा सुद्धा फडकवला नाही, अशा लोकांनी काँग्रेसवर बोलू नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.
नांदेडमध्ये शंखनाद सभा घेण्यात आली पण शंख कधी फुंकतात याचे भानही भाजपाला नाही. कालपर्यंत जे लोक काँग्रेसचे वजनदार नेते होते ते आता शंखनाद करत आहेत. काँग्रेसमध्ये असताना महाराष्ट्र केसरी असलेले अशोक चव्हाण आता जत्रेत कुस्ती खेळत आहेत. अशोक चव्हाण हे आमदार, खासदार, मंत्री व मुख्यमंत्री झाले. काँग्रेसमध्ये असताना ते महाराष्ट्र केसरी तर वडील शंकरराव चव्हाण हिंद केसरी होते, ते देशाचे सरंक्षण मंत्री व गृहमंत्री होते. नांदेड हे महाराष्ट्र व देशाचे नेतृत्व करणारे शहर होते पण त्याचे नाव घालवण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले आहे. अमित शाह यांनी नांदेडच्या सभेत काँग्रेस पक्षाच्या काळात चांगले काम झाले नाही अशी टीका केली. संरक्षण मंत्री व गृहमंत्री म्हणून यशस्वी काम केलेल्या शंकरराव चव्हाण यांचा व नांदेडचा हा अपमान आहे आणि हा अपमान होत असताना शंकररावांचे चिरंजीव अशोक चव्हाण गप्प बसले होते, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
0 टिप्पण्या