मोदी-शहा फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात, पाकिस्तान नाही:तशी त्यांच्यात हिंमतच नाही, संजय राऊत यांची टीका
चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण हे राष्ट्र प्रमुखांचे भाषण नव्हते. एकिकडे आमचे सैन्यदल, हवाई दल, नौदल पूर्णपणे पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना, मोदींनी त्यांचा घात केला, त्याना थांबवण्यात आले. वास्तविक पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे झाले असते. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ईडी आणि सीबीआयच्या मदतीने केवळ राजकीय पक्ष तोडू शकतात. त्यांची तेवढीच लायकी आहे. केवळ पक्ष तोडणे आणि पक्ष विकत घेणे एवढेच काम ते करु शकतात. पाकिस्तान तोडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. हिंमत असती तर पुढच्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तान तुटला असता, आमच्या सैनिकांची तशी तयारी होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे त्यांनी शेपूट घातले, असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची त्यांची लायकी नाही. त्यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा. आता हे तिरंगा यात्रा काढायला निघाले आहेत. भारतीय जनता पक्षाने आता अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्प यांचा फोटो लावून तिरंगा यात्रा काढावी. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. आता सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना नाही. कारण अखंड हिंदुस्तानाचे वीर सावरकर यांचे स्वप्न साकार करण्याची यांच्याकडे संधी होती. मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यांनी केवळ व्यापार केला. त्यांनी गौतम अदानी, अंबानी यांच्यासाठी व्यापार केला, असा आरोप राऊत यांनी केला. त्यांच्यासाठी व्यापार मोठा आहे, देश मोठा नाही. भविष्यात हे सर्व सौदे बाहेर येतील, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद आहे. ते या गोष्टी बोलणारच असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.
संरक्षण संदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाहीत. जर आमच्या देशाने गुडघे टेकले आहेत. आमच्या देशाचे नेतृत्व ट्रम्प करणार असतील तर त्याविषयी आम्ही चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी संरक्षण विषयी प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करता येणार नसल्याचे म्हटले होते. त्याबद्दल संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शरद पवार अजूनही अंधारात आहेत. त्यांची राष्ट्रभक्ती वेगळे आहे आणि आमची राष्ट्रभक्ती टोकाची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला देश विकला असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हा विषय चर्चेचा नाही. त्यामुळे मी त्याविषयी काही बोलणार नाही. राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती. त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता राज ठाकरे यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही शांत असल्याचे देखील ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या पक्षातील इतर नेते काय म्हणत आहेत? त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आम्ही राज ठाकरे यांना मानतो. राज ठाकरे यांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही वेगळा घेतला असे त्यांचे नेते म्हणत असतील तर ते राज ठाकरे यांनी स्पष्ट करावे. आम्ही केवळ लोक भावनेचा आदर केला आहे. आमचे मन खुले आहे. आमचे मन प्रभु रामाचे आणि हनुमानाचे मन आहे. मोकळ मन असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या