गुंडगिरी व दादागिरी कदापी खपवून घेणार नाहीत- सुशिलकुमार पावरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
धडगांव : २८ एप्रिल २०२५ रोजी विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा काढला होता.या मोर्चात का गेला? मोर्चात गेल्याचा व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा राग धरून धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगनी येथील सरपंच राज्या थाव-या पवार यांनी टेंब-या शिवा वळवी यांना वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथा बुक्यांनी व काठीने मारहाण केली.मारहाण केल्याबद्दल जुगनी येथील सरपंच विरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ नुसार कलम ११५(२),३५१(२),३५२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टेंब-या शिवा वळवी वय ६२ राहणार जुगनी डुगलीपाडा तालुका धडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी आम्ही गावातील गावक-यांनी ग्रामपंचायतची चौकशी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे मोर्चा काढला होता म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांनी ग्रामपंचायत जुगनी येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून चौकशी आदेश दिले आहे.त्याचा राग मनात धरून दिनांक ७ मे २०२५ रोजी फिर्यादी हे सुरसिंग ओजमा पवार जुगनी यांच्या घराजवळ उभा असतांना राज्या थाव-या पवार हे फिर्यादीस सांगू लागले की,तुम्ही मोर्चा काढल्यामुळे आपल्या ग्रामपंचायत कामाची चौकशी सुरू झाली आहे.तुम्ही मोर्चा का काढतात असे सांगून वाईट वाईट शिवीगाळ करून हाताबुक्यांनी व लाथांनी पाठीवर व हातावर मारहाण करून काठीने पाठीवर मारून मुका मार दिला आहे.त्याच्यापासून मला अमिताभ जोमा वळवी व दसा बारक्या वळवी राहणार जुगनी यांनी सोडवले.पुन्हा मला मारहाण करण्याची धमकी देऊन तेथून निघून गेला.मला मुका मार लागला आहे.सरपंच राज्या थाव-या पवार यांच्याविरुद्ध माझी फिर्याद आहे.
सदर मारहाण घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.भ्रष्टाचार, भूमाफिया विरोधात वनहक्क दावे,पाणी,रस्ता,शाळा,अंगणवाडी, रस्ता, वीज अशा मूलभूत हक्कांसाठी आमचा सामान्य जनतेचा हा जन आक्रोश मोर्चा होता.मोर्चातील मागण्या दडपण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.ग्रामपंचायत जुगनी येथील शिवसेना शिंदे गटाच्या सरपंचाची ही गुंडगिरी व दादागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत. सरपंचावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे.परंतू अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांना मोका लावला पाहिजे.पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे.या भ्रष्टाचारी सरपंचाला आम्ही कदापि माफ करणार नाहीत. याला कठोर शिक्षा झालीच पाहिजेत. अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या