चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर :-गडमुडशिंगी (ता. करवीर) गावातील माळी कुटुंबीयांच्या घराजवळ शुक्रवार दि 2 आणि रविवार दि 4 मे रोजी अंधश्रद्धेतून काही विधी करण्याचा प्रकार घडला होता. यामुळे हे कुटुंब दहशतीखाली होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही बातमी समजतात त्यांनी संबंधित कुटुंबीयांना संपर्क करून तात्काळ त्या कुटुंबीयांची भेट घेतली. कार्यकर्ते कुटुंबात भेटीसाठी गेले तेव्हा संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांचे शेजारी खूप घाबरलेले लक्षात आले. ज्या पद्धतीने पाठोपाठ दोन दिवस करणी सारखा प्रकार वाटावा अशा गोष्टी घराच्या चौकटीला लागून होतात हे पाहून या कुटुंबातील सर्वच जण विशेषतः महिला प्रचंड दहशतीखाली असल्याचे कार्यकर्त्यांना जाणवले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कुटुंबीयांशी चर्चा करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याआधी हाताळलेल्या प्रकरणांची माहिती दिली. तसेच संघटनेने हाताळलेल्या अशा काही घटनांचे व्हिडिओ दाखवून करणी, भानामती वगैरे प्रकारातून काही वाईट किंवा अनिष्ट गोष्टी घडवता येऊ शकत नाही याचा विश्वास दिला आणि त्यांच्या भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच या प्रकाराच्या अंधश्रद्धेमुळे आणि त्यातून तयार झालेल्या भीतीमुळे काहीजण तुम्हाला अंधश्रद्धेचे वेगवेगळे उपाय सुचवतील आणि त्यातून आर्थिक फसवणूक सुद्धा केली जाऊ शकेल. त्यालाही बळी पडू नये असे आवाहन केले. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला होता त्या ठिकाणी बसून संबंधित कुटुंबीयांसोबत चहापान करून त्यांच्या मनातील भीती कार्यकर्त्यांनी दूर केली. अंनिस कार्यकर्त्यांच्या या भेटीनंतर कुटुंबीयांच्या मनावरचा तणाव बराच कमी झालेला लक्षात आला. यावेळी महाराष्ट्र अंनिस राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, जिल्हा कार्याध्यक्ष हरी आवळे, जिल्हा प्रधान सचिव प्रमोद शिंदे, करवीर शाखा कार्याध्यक्ष संघसेन जगतकर हे उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी संबंधित गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करून गावात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा कृतीतून दहशत माजवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे व गावात अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन देखील केले.
दुसऱ्या दिवशी संबंधित कुटुंबीयांसोबत गांधीनगर पोलीस ठाणे येथे जाऊन असा अंधश्रद्धा प्रकार करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली. यावेळी पोलिस निरीक्षक तनपुरे यांनी संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा विश्वास माळी कुटुंबीय आणि अंनिस कार्यकर्त्यांना दिला आहे. यावेळी अंनिसचे प्रमोद शिंदे, संघसेन जगतकर, रामदास देसाई, रेश्मा खाडे, निशांत सुनंदा विश्वास हे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कुटुंबीयांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या रेश्मा खाडे यांनी माळी कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरात राहण्याचा निर्णय घेऊन त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद केला. त्यांच्यातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. माळी कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांच्या मनात दहशत माजवणाऱ्या या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखवलेल्या तत्पर कृतीशीलतेचे परिसरातून कौतुक.


0 टिप्पण्या