चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (22 मे) सायंकाळी एक महत्त्वपूर्ण कारवाई करत चारचाकी वाहन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन्स आणि लुटलेली मारुती सुझुकी व्हॅगनर कार (MH14GA4210) असा एकूण सुमारे 5 लाख 12 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सागर साहेबराव थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन संशयित इसम देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन व्हॅगनर कारमधून सोलापूरच्या दिशेने येत असल्याचे कळाले. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावाजवळ डांबरी रस्त्यालगत वडाच्या झाडाखाली पोलिसांनी सापळा रचला. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत दोन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, दोन मोबाईल फोन्स, एक इंटरनेट डोंगल आणि वरील क्रमांकाची व्हॅगनर कार आढळून आली.
संशयितांची नावे आणि गुन्ह्याची कबुली
अटक करण्यात आलेले संशयित पुढीलप्रमाणे आहेत:
चैतन्य उर्फ भैस्या पांडुरंग शेळके, रा. भोत्रा, ता. परांडा, जि. धाराशिव
करण शिवाजी भोसले, रा. खांडवी, ता. बार्शी, जि. सोलापूर
तपासादरम्यान या दोघांनी कबुली दिली की, त्यांनी किशोर सहदेव पवार (रा. भोत्रा) याच्या मदतीने काही दिवसांपूर्वी एका कारचालकास पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचे वाहन, मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती. या लुटीत वापरलेली शस्त्रे त्यांनी मारुती माने (रा. सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये देऊन खरेदी केल्याचेही स्पष्ट केले.
या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायदा 1979 अंतर्गत कलम 3, 7, 25 व भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 3(5) अन्वये गुन्हा क्रमांक 0285/2025 नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेला संपूर्ण मुद्देमाल पंचासमक्ष सील करून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास स.पो.नि. नागनाथ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. टोळीतील अन्य सदस्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, लुटीत वापरण्यात आलेल्या अन्य साधनांचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.
चारचाकी वाहन चोरी आणि शस्त्रबळावर लुटीप्रकरणी पोलिसांनी केलेली ही धाडसी कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता ही ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आश्वासक असल्याचे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक राहुल पांडुरंग देशपांडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष अभिनंदन होत आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता ही गुन्हेगारी नियंत्रणासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
0 टिप्पण्या