चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली –वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. काल मध्यरात्री गडचिरोली शहरात अशाच एका धक्कादायक घटनेने शहरवासीयांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. पहाटे अंदाजे तीनच्या सुमारास एकामागोमाग एक रानटी हत्ती शहरात घुसले व त्यांनी कॅम्प एरियातील रेडी गोडावून, बसस्थानक परिसर, कॉम्प्लेक्स एरिया,आयटीआय चौक तसेच मुख्य रस्त्यावर संचार केला.
या अचानक झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ आपल्या निवासी कार्यालयातून वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी श्री. रमेश कुमार जी यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली शहरात रानटी हत्तीचा अशा प्रकारचा प्रवेश ही पहिलीच घटना असून रानटी हत्ती आता ते शहरापासून पोर्ला मार्ग गेलेले आहेत अशी याबाबत संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे, असेही मा.खा. डॉ. नेते यांनी स्पष्ट केले.
"जरी जीवितहानी झाली नसली, तरी अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्कतेने पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीदेखील सतर्क राहावे, " असे आवाहन मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी यावेळी केले.
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना एक प्रकारची चेतावणी असून वन्यजीवांच्या वाढत्या वावराबाबत प्रशासनाने आणि नागरिकांनीही अधिक सजग राहणे अत्यावश्यक आहे.
0 टिप्पण्या