Ticker

6/recent/ticker-posts

लातूर-लामजना पाटी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली पाहणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर : आशियाई विकास बँक आणि केंद्र शासनाच्या सहाय्यातून लातूर-कव्हा-जमालपूर-हसेगाववाडी-अपचुंदा जावळी ते लामजना पाटी या 32.35 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लामजना पाटी येथे या कामाची पाहणी केली. 

यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, गणेश क्षीरसागर आणि उपअभियंता रोहन जाधव उपस्थित होते.

या रस्त्याच्या रुंदीकरण, मातीभराव, खडीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रीटीकरणासाठी 165 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लातूर येथून निलंगा, किल्लारी आणि उमरगाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होईल. कामाची गती पाहता हा रस्ता विहित मुदतीपूर्वी नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री भोसले यांनी व्यक्त केला.

लातूर ते लामजना पाटी मार्गाच्या काँक्रीटीकरणानंतर नागरिकांना औसा येथे न येता थेट निलंगा आणि किल्लारीला जाता येणार आहे. याशिवाय, उमरगा ते औसा मार्गाचे चौपदरीकरण आणि पुढील दहा वर्षांत प्रत्येक गावात सिमेंट रस्ते निर्माण करण्याचा मानस आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.

पाहणीवेळी रस्त्याच्या कामावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. उपअभियंता रोहन जाधव यांनी कामाचा तपशील सादर केला.

प्रारंभी पालकमंत्री श्री. भोसले यांनी लामजना पाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तांबरवाडी येथील विविध कामांची पाहणी

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी औसा मतदारसंघातील तांबरवाडी गावास भेट दिली. यावेळी त्यांनी शेतरस्ता, जनजीवन मिशन विहीर व बिहार पॅटर्न अंतर्गत करण्यात आलेली वृक्षलागवड इत्यादी विकासकामांची पाहणी केली. तसेच येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या