Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीत लिंगायत स्मशानभूमीत तरुणांवर कोयता व लोखंडी रॉडने हल्ला; गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर– बार्शी शहरातील तुळजापूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीत भांडण मिटवण्याच्या बहाण्याने पाचारण करून तीन तरुणांवर कोयता आणि लोखंडी रॉडने गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना ४ मे २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आयान शेख, शहाबाज शेख, हिदायत शेख (सर्व रा. राणा कॉलनी, बार्शी) आणि शाहीद बागवान (रा. यशवंत नगर, बार्शी) या चार जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फिर्यादी दत्तात्रय बारीकराव शिरतोडे (वय ४५, व्यवसाय - गवंडी, रा. मुक्ताई नगर, तुळजापूर रोड, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा विनोद शिरतोडे याला त्याच्या मित्रांसह भांडण मिटवण्याच्या निमित्ताने वरील संशयितांनी स्मशानभूमीत बोलावले. त्याठिकाणी आयान शेख याने विनोदच्या डोक्याच्या मधोमध कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. शहाबाज शेख याने सत्यम लंबे याच्या डाव्या डोळ्याजवळ लोखंडी रॉडने प्रहार केला, तर शाहीद बागवान याने गौरव मेटेच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. हिदायत शेख याने तिघांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. या चौघांनी "तुम्हाला ठार मारतो" अशी धमकीही दिली.

फिर्यादी दत्तात्रय शिरतोडे यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीप्रमाणे, घटनेच्या वेळी त्यांनी पत्नी रुक्मिणी यांचा फोन आल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आरोपी हे पळून गेले होते. जखमी तरुणांनी बार्शी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(2), 3(5), 351(2), 351(3) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या