Ticker

6/recent/ticker-posts

२४ तासांत शेतमाल चोरी प्रकरण उघडकीस; बार्शी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४४,८०० रुपयांचा माल जप्त ; आरोपी पोलीस कोठडीत

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर – शेतकऱ्यांच्या मालाची चोरी ही अत्यंत संवेदनशील बाब असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या कष्टावर होतो. अशा प्रकारची घटना बार्शी शहरातील मार्केट यार्ड परिसरात नुकतीच घडली होती. मात्र या गंभीर गुन्ह्याची दखल घेत बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अट्टल चोरट्याला अटक करून, चोरी गेलेला सुमारे ४४,८०० रुपये किमतीचा शेतमाल जप्त करण्यास यश मिळवले आहे.

ही कामगिरी म्हणजे पोलीस दलाच्या तत्परतेचा, दक्षतेचा आणि गुन्हे उकलण्यातील कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे.

या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३०/२०२५, भारतीय दंड संहिता कलम ३७९ (चोरी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी निलेश सुभाष साखरे (वय ३४, रा. सुभाषनगर, बार्शी) हे बार्शी मार्केट यार्डमधील प्लॉट नं. १३० येथे 'सुभाष उत्तेश्वा साखरे जनरल मर्चंट अ‍ॅन्ड कमिशन एजंट' या नावाने आडत व्यवसाय करतात.

दि. १९ एप्रिल २०२५ ते ५ मे २०२५ या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल दुकानासमोर ठेवलेला असताना, अज्ञात चोरट्याने १४ पोती ज्वारी, ७ पोती सोयाबीन, ४ पोती पांढरी तुर आणि १ पोते हरभरा असा एकूण ४४,८०० रुपयांचा शेतमाल चोरून नेला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांनी गुन्ह्याच्या गांभीर्याची तातडीने दखल घेतली व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्यासह तपास पथकास मार्गदर्शन दिले.

सखोल तपासादरम्यान पो.हे.कॉ. श्रीमंत खराडे यांना पोलीस रेकॉर्डवरील संशयित आरोपीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अविनाश ज्ञानदेव आदाटे (वय २३, रा. बार्शी) यास ताब्यात घेतले. कसून चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्याकडून चोरलेला संपूर्ण शेतमाल – १४ पोती ज्वारी, ७ पोती सोयाबीन, ४ पोती पांढरी तुर व १ पोते हरभरा – हस्तगत करण्यात आला असून आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. जालीदर नालकुल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत नियोजनबद्ध, समर्पित व अचूक कारवाई केली.

या पथकात खालील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहभाग घेतला:

पो.उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर,सपाफो अजित वरपे
पो.हे.कॉ. श्रीमंत खराडे,अमोल माने, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे,पो.ना. संगाप्पा मुळे, पो.कॉ. अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे,सचिन देशमुख, सचिन नितनात, अविनाश पवार,प्रल्हाद अकुलवार, इसामियाँ बहिरे
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. श्रीमंत खराडे हे करत आहेत.

ही कामगिरी म्हणजे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सतत सज्ज आणि कार्यक्षम आहे, याचे उत्तम उदाहरण ठरते. गुन्ह्याचा जलद छडा लावणे, संशयितास अटक करणे आणि शेतमाल परत मिळवणे ही नागरिकांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी दाखवलेली दक्षता, चिकाटी आणि टीमवर्क हे खरोखरच कौतुकास्पद आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या