Ticker

6/recent/ticker-posts

कोळसा व लाकूड तस्करांवर कोसळला वनविभागाचा धडक छापा!

 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सांगोला :-वनपरिक्षेत्र अंतर्गत अवैधरित्या कोळसा व लाकूड वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर वनविभागाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर साहित्य आणि वाहने जप्त केली आहेत. विविध गावांमध्ये वेगवेगळ्या वेळी करण्यात आलेल्या कारवायांमुळे अवैध वृक्षतोड व कोळसा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी मौजे वाढेगाव येथे गस्त घालत असताना MH 10 DL 7170 क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या 95 पोती कोळसा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. अंदाजे ₹60,000/- किंमतीचा कोळसा वनपरवाना नसताना वाहतूक करत असल्यामुळे ट्रॅक्टरसह माल जप्त करण्यात आला. आरोपी विवेक वसंत शिंदे (रा. वाढेगाव) आणि इतर पाच जणांवर वनगुन्हा क्रमांक 01/2025 नोंदवण्यात आला आहे.

मेडशिंगे येथेही वनविभागाने कारवाई करत 108 पोती कोळसा वाहतूक करत असलेली ट्रॉली जप्त केली. यामध्ये देखील विवेक शिंदे आणि इतर पाच जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाजारभावानुसार कोळशाची किंमत ₹71,000/- इतकी आहे. या प्रकरणात वनगुन्हा क्रमांक 02/2025 नोंदवण्यात आला आहे.

वनपाल जुनोनी, वनरक्षक धेरडी यांच्यासह डिकसळ भागात गस्त घालत असताना MH 45 A 5660 क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये 3.916 घ.मी कडुलिंब लाकूड (20 नग) विनापरवाना वाहतूक करताना आढळले. सचिन संभाजी गावडे व इतर तीन जणांवर वनगुन्हा क्रमांक 01/2025 नोंद करण्यात आला असून अंदाजे मालमत्ता ₹25,000/- किंमतीची आहे.

दि. 17 जून 2025 रोजी रात्री 10.30 वाजता कडलास-मानेगाव परिसरात रात्रगस्त दरम्यान वनअधिकाऱ्यांनी MH 45 0035 क्रमांकाच्या टाटा आयशर वाहनातून 21.42 घ.मी जळावू लाकूड (कडुलिंब व चिंच प्रजाती) वाहतूक करताना पकडले. यामध्ये सागर नारायण काशीद (रा. कडलास) व इतर एकावर वनगुन्हा क्रमांक 03/2025 नोंदवण्यात आला असून मालमत्ता वनविभाग कार्यालय सांगोला येथे ठेवण्यात आली आहे.

सदर सर्व कारवाया मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे एन.आर. प्रवीण, उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते (अतिरिक्त कार्यभार सोलापूर), सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम विठ्ठल जाधवर व त्यांच्या चमूकडून करण्यात आल्या आहेत.

वनविभागाने स्पष्ट शब्दांत नागरिकांना आवाहन केले आहे की, विनापरवाना वृक्षतोड, कोळसा वाहतूक, लाकूडतस्करी, वन्य प्राणी शिकार, अतिक्रमण या कोणत्याही प्रकारच्या वनगुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या