पुणे:नणंद आणि तिच्या मुलांनी केलेल्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडीत घडली. याप्रकरणी नणंदेसह चौघांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वर्षा तुकाराम रणदिवे (वय ३५, रा. व्यंकटेश अपार्टमेंटसमोर, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नणंद उज्ज्वला बागाव, भाचा योगेश बागाव (वय ३५), भाची वैशाली बागाव (वय ३२) व भाची सुवर्णा बागाव (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पती तुकाराम रणदिवे (वय ५३, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला बागाव या फिर्यादी तुकाराम रणदिवे यांची बहीण आहे. रणदिवे आणि बागाव शेजारी राहायला आहेत. उज्ज्वला, तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली आणि सुवर्णा यांनी वर्षा यांना टोमणे मारून तिचा छळ केला. छळ असह्य झाल्याने वर्षा यांनी आठ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, आरोपींनी केलेल्या छळामुळे वर्षा यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार करत आहेत.
0 टिप्पण्या