चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-शहरातील जुना कुंभारी रोड परिसरात राहणाऱ्या प्रिती आनंद मैलेंच्या (वय 32) गळ्यातील सोन्याचे मणी-मंगळसूत्र (किंमत अंदाजे ₹80,000) अज्ञात महिलेने चोरी केल्याची घटना 29 मे 2025 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. सदर घटना देवी ज्वेलर्स, निलम नगर ते विजय नगर रिक्षा स्टॉप दरम्यान घडली असून, MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रिती मैलेंनी दिलेल्या जबाबानुसार, त्या देवी ज्वेलर्समध्ये मंगळसूत्र उतरवण्यासाठी गेल्या होत्या. उतरवलेले मंगळसूत्र त्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवले आणि ती पर्स मालाच्या पिशवीत ठेवल्यानंतर त्या रिक्षाने घरी परतत होत्या. रिक्षात त्यांच्या दोन्ही बाजूंना दोन अनोळखी महिला बसल्या. डाव्या बाजूला बसलेली अंदाजे 40 ते 45 वयोगटातील, सडपातळ शरीरयष्टीची, काळी-सावळी रंगाची महिला, राखाडी रंगाची साडी परिधान केलेली व पायात रबरी चप्पल घातलेली होती.
रिक्षा बोळकोटे नगर स्टॉपवर पोहोचल्यावर ही महिला घाईत उतरली. त्यानंतर प्रिती मैलेंनी त्यांच्या पिशवीतील पर्स तपासली असता, ती हरवलेली आढळली. त्यांनी त्वरित रिक्षाचालकास पुन्हा बोळकोटे नगर येथे नेण्यास सांगितले, परंतु संशयित महिला तिथे मिळून आली नाही.
या घटनेमुळे महिलांमध्ये सार्वजनिक प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. MIDC पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे.
0 टिप्पण्या