Ticker

6/recent/ticker-posts

या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे असे प्रतिपादन समुपदेशक सौ.वंदना मांढरे



चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर-: गोरगरीब कामगारांच्या, कष्टकरी लोकांच्या मुला-मुलींनी शिक्षण घेतले तरच त्यांचा विकास होईल. याकरीता अहोरात्र काम करून स्वर्गीय श्रीमान शंकरलाल (भाऊ) मुथा यांनी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संकुलाचे रोपटे लावले. आज या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे असे प्रतिपादन समुपदेशक सौ.वंदना मांढरे यांनी मंगळवारी ता.१५ केले. त्या सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने आदरणीय शिक्षणमहर्षी  स्वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा ( भाऊ) यांच्या 16 व्या पुण्यस्मरणा निमित्त प्रशालेत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या व उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या .
यावेळी संस्थेचे मानद सचिव ॲड. राजेंद्रकुमारजी  मुथा, सहसचिव अनिलकुमारजी कांकरिया,प्रकाशचंदजी बंब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे ,उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, सहाय्यक अधिक्षक राजेश वसावे ,चिंचवड पोलिस ठाणे गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, संस्थेचे व्यवस्थापक सतीश भारती, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.सारंगा भारती, शांतता समिती सदस्य धनंजय कुलकर्णी,सुभाष मालुसरे,विभाग प्रमुख दिपक थोरात, संस्थेचे सर्व विभाग प्रमुख,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच सामुदायिक नवकार महामंत्र व ओम नमः शिवाय जपाने करण्यात आली. यानिमित्त इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी  विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुक मार्क तयार करणे कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा (सामान्यज्ञान),ऑरगंडी फुले तयार करणे कार्यशाळा, हस्ताक्षर स्पर्धा व प्रदर्शन, पाककला स्पर्धा ( व्हेज पॅटीस ,प्रसादाचा शिरा) शिवणकला, लाठीकाठी चालविणे तसेच कराटे प्रशिक्षण इत्यादी उपक्रम घेण्यात आले. 
"एक पेड माॅ के नाम अभियाना अंतर्गत शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध उपयोगी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी  प्रशालेतील विद्यार्थिनी निधी कुऱ्हाडे, रेणुका वैद्य, अन्वी  दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
प्रास्ताविक भाषणात प्राचार्या. सौ. सारंगा भारती यांनी स्वर्गीय शंकरलाल भाऊ यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी त्या म्हणाल्या की,स्त्रियांच्या शिक्षणासाठी भाऊंनी खूप मोठी मेहनत घेऊन सर्व सोई युक्त व सुसज्ज  अशी १५०० मुलींसाठी पहिली स्वतंत्र शाळा चिंचवड परिसरात उभी केली म्हणून परिसरातील सामान्य गोरगरीब कामगारांच्या मुलींनी शिक्षण घेता आले. आज लाखोंच्या संख्येने मुलामुलींनी भाऊंनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेतून आपले शिक्षण पूर्ण करून चांगल्या पदांवर कार्यरत आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती नेवाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापिका सौ.सुषमा बंब यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या