आ. मुनगंटीवार यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली बल्लारपूर शहरातील रवींद्रनगर वार्ड, मौलाना आझाद वॉर्ड, पं. दीनदयाल उपाध्याय वॉर्ड आणि डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डांमधील वनजमिनीवरील घरे हटविली जाणार असल्याच्या अफवांनी या वार्डातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण केले. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या हिताचे रक्षण ही माझी जबाबदारी असून या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी केले.
वनजमिनीवरील निवासी घरांचे अतिक्रमण असलेल्या वार्डामध्ये आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, शहराध्यक्ष रणंजय सिंग,बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे, नागरिकांची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, रवींद्रनगर, मौलाना आझाद वॉर्ड, पं. दीनदयाल उपाध्याय वॉर्ड आणि डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड या भागांतील नागरिक मागील ३० ते ४० वर्षापासून वनजमिनीवर वास्तव्यास आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू असतानाच काहीजणांनी अफवा पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
सदर नागरिक मागील ३० ते ४० वर्षांपासून विना पट्ट्याने या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या चारही वार्डांतील नागरिकांना कोणीही बेघर करू शकत नाही. त्यामुळे कोणीतरी आम्हाला हटवेल, अशी भीती आणि भाव मनातही आणू नये.
या चारही वॉर्डांमध्ये एकूण २८६५ घरे वनजमिनीवर असून, सुमारे १०,१८० नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या सर्व वॉर्डांमध्ये शासनाच्या वतीने रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा अशा सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण २८६५ मालमत्तांपैकी सुमारे २५८५ मालमत्ता वनविभागाच्या जागेवर असून २७८ मालमत्ता नझूलच्या जागेवर स्थित आहेत. त्यापैकी पंडित दीनदयाल वार्डातील १२४ मालमत्ता तसेच रवींद्र नगर वार्डातील १५४ मालमत्ता नझूलच्या जागेवर आहे. या सर्व मालमत्तांचे एकत्रित क्षेत्रफळ सुमारे ५९ हेक्टर म्हणजेच १५० एकर इतके आहे.
नझूलच्या जागेवर पट्टे देणे तुलनेने सोपे असले, तरी वनविभागाच्या जागेवर पट्टे देणे अधिक कठीण आणि गुंतागुंतीचे आहे. तथापि, या जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना पट्टे देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, महसूल जमिनीवर पट्टे वितरणासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक विशेष टीम तयार करून, हा विषय दिल्लीमध्ये मा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी व केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्यासमोर मांडून विशेष बैठकीचे आयोजन करावे लागेल. तसेच, येथील वास्तव्यास असलेल्या प्रत्येक अतिक्रमणधारक कुटुंबाचा सविस्तर फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने पार पाडावी.
नागरिकांच्या हिताचे रक्षण ही माझी जबाबदारी असून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
0 टिप्पण्या