अनधिकृत इंग्लिश स्कूल बंद करण्याची भगवानदादा भालेराव यांची मागणी
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड
हिमायतनगर - तालुक्यात शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजलेले पहावयास मिळत असून अगोदरच १४ जिल्हा परिषद शाळा बिनशिक्षकी शाळा असून तालुक्यामध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षक रिक्त आहेत. सध्याचे गटशिक्षणाधिकारी मोठ्या सीताफिने हिमायतनगर तालुक्याच्या शिक्षण विभागाचा गाडा सांभाळताना दिसून येत आहेत. अशातच हिमायतनगर तालुक्यामध्ये अनधिकृत शाळा , क्लासेस, इंग्लिश स्कूल यांनी डोके वर काढले असून यांचा उपद्रव शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी यांच्या नजरेतच पडत नाही. अनधिकृत शाळा, क्लासेस तसेच इंग्लिश स्कुलच्या संचालकांनी विद्यार्थ्यांची टी.सी. जिल्हा परिषद शाळेत ठेवत क्लासेस साठी विद्यार्थी त्यांच्या शाळेत, क्लासेस, इंग्लिश स्कुलमध्ये दिवसाढवळ्या दिसून येत आहेत. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांनीही त्या विद्यार्थ्यांची हजरी कशी टाकतात अन् हा प्रकार कसा खपवून घेतला जात आहे याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय सम्राट सेनाचे संस्थापक अध्यक्ष भगवानदादा भालेराव यांनी आपल्या तक्रारीतून हिमायतनगर तालुक्यातील क्लासेसच्या नावाखाली चालणाऱ्या अनधिकृत इंग्लिश स्कुल बंद करण्याची तक्रार गटशिक्षणाधिकारी हिमायतनगर यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, हिमायतनगर शहरातील कुसुम हायटेक इंग्लिश स्कुलला युडाईस (UDISE ) क्रमांक नसताना, शासनाची कोणतीही परवानगी नसतानाही पहिली ते दहावीपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत अनधिकृत शाळा सुरू आहे. सदरील शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत व इतर शाळेत असून उपस्थिती शाळेमध्ये व विद्यार्थी कुसुम हायटेक इंग्लिश स्कुलमध्ये आहेत. तसेच ज्ञानदीप कोचिंग क्लासेसच्या नावाखाली माने सर हे २ ते ५ पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत UDISE युडाईस नसताना अनधिकृतपणे क्लासेसच्या नावाखाली शाळा चालवीत आहेत. तसेच हिमायतनगर तालुक्यात अनेक ठिकाणी प्रायमरी इंग्लिश स्कुलच्या नावाखाली पहिली ते पाचवी पर्यंत परवानगी नसताना शासनाची दिशाभूल करून लाखो रुपये कमवत आहेत.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कडक कार्यवाही करावी. तसेच अनधिकृत इंग्रजी शाळा बंद करण्यात यावी अन्यथा १५ जुलै मंगळवार रोजी अमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही अखिल भारतीय सम्राट सेनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानदादा भालेराव यांनी निवेदनातून दिला आहे.
तक्रारीचे निवेदन येताच खडबडून जागे झाले गटशिक्षणाधिकारी
या प्रकरणाबाबत भगवानदादा भालेराव यांनी दिनांक २६ जून रोजी तक्रारीचे निवेदन देताच गटशिक्षणाधिकारी यांना खडबडून जाग आली असून त्यांनी लगेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबत एक शासनपत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये नमुद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित, शासकीय आश्रम शाळा व शाळेतील नियमित विद्यार्थी शालेय वेळेत अन्य अनधिकृत इंग्रजी शाळा शिकवणी मध्ये जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आपल्या निदर्शनास यापुर्वीच आणुन देण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थी शालेय वेळेत शाळेत उपस्थित राहतील यासाठी वेळोवेळी पालक भेटी घेण्यात याव्यात. पालक मेळावे आयोजित करावे, अध्ययन प्रक्रियेत आनंददायी वातावरण निर्माण करावे जर विद्यार्थी शालेय वेळेत शाळेत उपस्थित राहत नसतील तर त्यांची अनुपस्थिती टाकण्यात यावी. तसेच अशा अपात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. अशा विद्यार्थ्यांची शालेय अनुपस्थिती असताना शाळेत उपस्थिती नोंदवल्यास अथवा शासनाच्या योजनांचा लाभ दिल्याचे आढळल्यास संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
या प्रकरणावरून हिमायतनगर तालुक्यातील शिक्षण विभागाची सद्यस्थिती किती बिकट आहे हे पहावयास मिळत आहे. अगोदरच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता घटत असून तालुक्यामध्ये अनधिकृतपणे चालणाऱ्या क्लासेस, इंग्लिश स्कुल यांनीही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत ठेवत शिकवणीसाठी विद्यार्थी आपल्याकडे ठेवत असल्याने यातून शासनाची दिशाभूल होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यात क्लासेसच्या नावाखाली अनधिकृत इंग्लिश स्कूल कोणाच्या कृपेने चालतात ? दिवसाढवळ्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाची दिशाभूल केली जात आहे याकडे कुणाचे लक्ष नाही का ? यासह अनेक प्रश्नांनी आ..वासला आहे. या प्रकरणावर गटशिक्षणाधिकारी काय ॲक्शन घेतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून दोषींवर योग्य ती कार्यवाही करून हिमायतनगर तालुक्यातील चालू असलेल्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराची घडी व्यवस्थित बसवणे ही काळाची गरज आहे.
0 टिप्पण्या