Ticker

6/recent/ticker-posts

राज्य अभियंता संघटना चंद्रपुर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.


चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती : राज्य अभियंता संघटना, चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे आज एक महत्त्वाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात राज्यातील विविध शासकीय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ओपन कॉन्ट्रॅक्टवर, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था व विकासक यांना शासनाकडून आठ-दहा महिन्यांपासून मिळणाऱ्या थकित देयकांची तातडीने अदा करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, नगरविकास, जलसंधारण, जलजीवन मिशन, जलसंपदा आदी अनेक विभागांनी विकासक व ठेकेदारांकडून कामे करून घेतली असून, त्यांचे एकूण 89 हजार कोटी रुपये शासनाकडून थकित आहेत. ही रक्कम देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे सुशिक्षित अभियंते व संबंधित कामगार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून विविध आंदोलने, निवेदने, मोर्चे करूनही राज्य शासनाने यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या विकासकामांवर, योजनांवर व प्रगतीवर याचा मोठा परिणाम होत आहे.

*इंजी. जगदीश लवाडिया, जिल्हाध्यक्ष, राज्य अभियंता संघटना, चंद्रपूर यांचे मत :*

“राज्यातील सर्वच विभागांनी विकासकांकडून घेतलेली कामे पूर्णत्वास गेली असून त्याचे देयक अनेक महिन्यांपासून थकवले गेले आहेत. या आर्थिक थकव्यामुळे हजारो सुशिक्षित अभियंते, मजूर संस्था व विकासक अडचणीत सापडले आहेत. शासनाने त्वरित देयके अदा करावीत. अन्यथा हे कामकाज ठप्प होऊन विकासाला खीळ बसेल. शासन व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.”

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या