Ticker

6/recent/ticker-posts

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित भव्य_आट्यापाट्या_स्पर्धा_२०२५


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज:- येथील प्रताप क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या ग्रामीण भागातील मराठमोळ्या रांगड्या 'आट्यापाट्या' क्रीडा स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात नेवरेच्या जयशिवशंकर संघाने कचरेवाडीच्या जय बिरोबा संघास पराभूत करत विजेतेपदाचे चषक पटकावले.  
दि. १७ ऑगस्ट रोजी शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयचे संचालक मा.श्री. मिलिंद दीक्षित यांच्या शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील मा.श्री. दिपकराव खराडे पाटील, मा.श्री.प्रदीपराव खराडे पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उदघाट्न प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे दिक्षित साहेब यांनी गेल्या ४६ वर्षांपासून मंडळ राबवित असलेल्या विविध क्रीडा स्पर्धाचे व उपक्रमाचे कौतुक केले. “ प्रताप क्रीडा मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळाने घडविल्यामुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचलो असल्याचे सांगितले. माननीय बाळदादांच्या कल्पक विचारातून व इथल्या मातीच्या गुणधर्मामुळे अनेक खेळाडू, कलाकार, अधिकारी घडले असून आज ते विविध क्षेत्रात अकलूजचे नाव उज्वल करत आहेत. जगभरात क्रीडाअधिकारी म्हणून अनेक सन्मान होतात पण इथला सन्मान हा आयुष्यातील सर्वांत मोठा सन्मान असल्याचे सांगितले. यानंतर आट्यापाट्या मैदान पूजनाने सामन्यांची सुरुवात झाली. 
यास्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस या तालुक्यातील नामवंत अशा ४९ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
स्पर्धेदरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्री. मदनसिंह मोहिते-पाटील, युवा नेते मा. चि. सयाजीराजे मोहिते-पाटील या मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला व प्रेक्षणीय सामन्यांचा आनंद लुटला.
सकाळी १० वाजल्यापासून सुरू असलेल्या स्पर्धा रात्री १.४५ वा. पर्यंत सुरू होत्या. अंतिम सामना जय विरबा कचरेवाडी व जय शिवशक्ती,नेवरे या संघात झाला. अत्यंत रोमहर्षक व चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात शिवशक्ती,नेवरे संघाने प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना रु. ४४०००/- व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. उपविजेता जय बिरोबा, कचरेवाडी या संघास द्वितीय क्रमांकाचे रु. ३३०००/- तृतीय क्रमांक जय हनुमान म्हैसगाव या संघास रु. २२०००/- तर चतुर्थ क्रमांक ९९९ शिरढोण यांना रु. ११०००/- चे बक्षिसे मिळाली. तसेच उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेले श्रीराम संगम, जय हनुमान तालीम नेवरे, जय शंकर नेवरे, १४/१५ सेकशन सेक्शन यांना प्रत्येकी ५००० रु. चे बक्षीसे देण्यात आली. 
कार्यक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव, सर्व संचालक, स्पर्धा प्रमुख भिमाशंकर पाटील,सुभाष चव्हाण, आजी-माजी खेळाडू, मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, खेळाडू व बहुसंख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
स्पर्धेचे समालोचन बापूसाहेब लोकरे, सचिन धुमाळ, संजय राऊत यांनी तर सूत्रसंचालन राजकुमार पाटील, शकील मुलाणी, अनंत कोळी यांनी केले. स्पर्धेतील पंच म्हणून कामकाज पाहिलेल्या ६४ जणांचा, आरोग्य सेवकांचा, सुरक्षा रक्षकांचा मंडळाचे वतीने सन्मान करण्यात आला.  मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मंडळाच्या सर्व सभासदांचे व कमिटीचे कामकाज केलेल्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या